मोठी बातमी : ईडीच्या रडारवर आता पुणे महापालिका! जम्बो कोविड सेंटरच्या निविदा प्रक्रियेची चौकशी सुरू | पुढारी

मोठी बातमी : ईडीच्या रडारवर आता पुणे महापालिका! जम्बो कोविड सेंटरच्या निविदा प्रक्रियेची चौकशी सुरू

पांडुरंग सांडभोर

पुणे : कोविड साथीच्या काळात पुण्यातील जम्बो कोविड सेंटर चालविण्यासाठी देण्यात आलेल्या लाईफलाईन कंपनीच्या निविदा प्रक्रियेचीही चौकशी आता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सुरू केली आहे. यासंबंधीच्या सर्व प्रक्रियेची आणि संबधित अधिकार्‍यांची माहिती ईडीने पुणे महापालिकेकडून मागविली असल्याचे समजते. कोविड रुग्णांच्या उपचारांसाठी शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आले होते.

हे सेंटर चालविण्याचे काम लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिस कंपनीला देण्यात आले होते. दरम्यान, याच कंपनीकडे मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या जम्बो कोविड सेंटरचेही काम होते. कोणताही अनुभव नसताना आणि बनावट कागदपत्रे सादर करून या कंपनीने हे काम मिळविले असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू असून, ईडीने मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांचीही गेल्या आठवड्यात चौकशी केली. त्यानंतर आता ईडीने आपला मोर्चा पुणे महापालिकेकडे वळविला आहे.

मुंबईतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील जम्बो कोविड सेंटर चालविण्यासाठी काढण्यात आलेल्या सर्व निविदा प्रक्रियेची माहिती ईडीने पुणे महापालिकेकडून मागविली आहे. यामध्ये प्रामुख्याने निविदा प्रक्रिया, लाईफलाईन कंपनीने सादर केलेली कागदपत्रे, त्यांना देण्यात आलेल्या बिलांची रक्कम आदींची सविस्तर माहिती आणि संबधित प्रक्रिया राबविणार्‍या आणि बिले अदा करणार्‍या अधिकार्‍यांची नावेही देण्यात यावीत, असे ईडीने महापालिकेला कळविले आहे.

महापालिका अनभिज्ञ; पण उच्चस्तरीय सूत्रांकडून दुजोरा
महापालिकेच्या प्रशासनाकडे ईडीच्या या चौकशीबाबत विचारणा केली असता, त्यांनी याबाबत आपण अनभिज्ञ असल्याचा दावा केला. मात्र, मुंबईतील उच्चस्तरीय सूत्रांनी ‘पुढारी’शी बोलताना ईडीच्या या प्रक्रियेला दुजोरा दिला. जम्बो कोविड सेंटर हे पीएमआरडीएच्या माध्यमातून सुरू करण्यात आले असले आणि त्यांची बिले ही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आलेली असली तरी महापालिकाही या प्रक्रियेशी संबंधित असल्याने महापालिकेकडेही विचारणा करण्यात आली असल्याचे या सूत्रांनी स्पष्ट केले.

Back to top button