कसबा पेठेत 15 हजार मतदार घटले; 2019 च्या तुलनेत चिंचवडमध्ये अर्ध्या लाखाने वाढले | पुढारी

कसबा पेठेत 15 हजार मतदार घटले; 2019 च्या तुलनेत चिंचवडमध्ये अर्ध्या लाखाने वाढले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 2019 च्या तुलनेत 2023 मध्ये विधानसभा निवडणुकीत कसबा विधानसभा मतदारसंघात पंधरा हजार मतदार कमी झाले, तर चिंचवड विधानसभा मतदारसंघात मात्र तब्बल 48 हजार मतदारांची संख्या वाढली. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या दोन्ही जागांची निवडणूक जाहीर झाली आहे. 31 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. 27 फेब्रुवारीला मतदान होईल. या दोन्ही मतदारसंघांत भारतीय जनता पक्षाचे आमदार विजयी झाले होते.

2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत कसबा विधानसभा मतदारसंघात एक लाख 44 हजार 124 पुरुष मतदार होते. एक लाख 46 हजार 552 महिला मतदारांची नावे यादीत होती. केवळ चार तृतीयपंथी मतदार होते. जिल्हाधिकारी कार्यालयाने 5 जानेवारी रोजी प्रसिद्ध केलेली अंतिम मतदार यादी पोटनिवडणुकीत ग्राह्य धरली जाणार आहे. त्यानुसार कसब्यात 15 हजार 255 मतदारांची संख्या घटली असून, त्यात सात हजार 254 पुरुष मतदार, आठ हजार दोन महिला मतदार घटले. त्यामुळे आता कसब्यात पुरुष मतदार एक लाख 36 हजार 873, महिला एक लाख 38 हजार 550 मतदार आहेत, तर पाच तृतीयपंथी मतदार आहेत.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात 2019 मध्ये पाच लाख 18 हजार 309 मतदार होते. 5 जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीनुसार 48 हजार 106 मतदार वाढले आहेत. त्यात पुरुष मतदार 25 हजार 344 असून, त्यामुळे आता तीन लाख एक हजार 648 मतदार आहेत. महिला मतदारांमध्येही 22 हजार 759 इतकी वाढ झाली आहे. तृतीयपंथी मतदार केवळ तीन वाढले असून, एकूण 35 मतदार आहेत. त्यामुळे आता एकूण मतदारांची संख्या पाच लाख 66 हजार 415 मतदार झाली आहे.

Back to top button