पुणे : पार्टटाईम जॉब पडला महागात; महिलेला 19 लाखांना गंडा | पुढारी

पुणे : पार्टटाईम जॉब पडला महागात; महिलेला 19 लाखांना गंडा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पार्टटाईम जॉबच्या माध्यमातून दिवसाला अडीच ते तीन हजार रुपये कमविण्याचे प्रलोभन दाखवून तिघांनी एका महिलेची तब्बल 19 लाख 55 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी, रँडस्टॅड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चेन्नईचे मालक, मे. डिव्हाईन एन्टर प्रा.चे मालक सुरेश कुमार भगोरा आणि केकट्रीपस् डॉटकॉमचे मालक अशा तिघांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार मार्केट यार्ड पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 8 ते 12 डिसेंबर या कालावधीत घडली आहे. याबाबत मार्केटयार्ड परिसरातील एका 37 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन आरोपींपैकी एकाने फिर्यादीच्या मोबाईलवर फोन केला. त्यानंतर पार्टटाईम जॉब करून एक दिवसामध्ये अडीच ते तीन हजार रुपये कमवून देण्याचे प्रलोभन दाखविले. पुढे व्हॉटस्अपवर सर्व माहिती पाठवून केकट्रीप्स् डॉटकॉम या संकेतस्थळावर लॉगीन करण्यास सांगून फिर्यादींची सर्व माहिती भरून घेतली. फिर्यादींना आरोपींनी ऑनलाईन टुर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स्चे रेटिंग आणि रिव्हू करण्याचा टास्क दिला. फिर्यादींनी आरोपींच्या सांगण्यानुसार तो टास्क पूर्ण केला.

आरोपी सुरेश भगोरा याने फिर्यादींचा विश्वास संपादन करून त्याच्या यूपीआय आयडीवर 5 हजार रुपये भरण्यास सांगितले. फिर्यादींना टास्कमध्ये मोबदला मिळत आहे, असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी मोठी रक्कम देण्याचे प्रलोभन दाखवून तब्बल 19 लाख 55 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले. दरम्यान, फिर्यादींना फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार मार्केटयार्ड पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, गुन्हे निरीक्षक ढमढेरे तपास करीत आहेत.

Back to top button