पुणे : मेट्रोचा मुहूर्त पुन्हा हुकला; काम रेंगाळले, आणखी दीड महिना तरी धावण्याची शक्यता कमी | पुढारी

पुणे : मेट्रोचा मुहूर्त पुन्हा हुकला; काम रेंगाळले, आणखी दीड महिना तरी धावण्याची शक्यता कमी

ज्ञानेश्वर बिजले

पुणे : पुण्यातील मेट्रो प्रकल्पाचे काम विनाकारण रेंगाळल्याचे दिसत असून, दहा महिन्यांपूर्वी बारा किलोमीटर मार्गावर सुरू झालेली मेट्रो अद्यापही पुढील टप्प्यात धावण्याची चिन्हे दिसत नाहीत. मेट्रो 26 जानेवारीला धावेल, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नोव्हेंबरमध्ये जाहीर केले होते. मात्र, आणखी किमान दीड महिना मेट्रो धावण्याची शक्यता कमीच आहे.

पुण्यातील मेट्रोचे काम पाच वर्षांपूर्वी सुरू झाले. मात्र, अद्यापही दोन्ही मार्गांवर मेट्रो केवळ बारा किलोमीटर धावत आहे. तेदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभरात मेट्रो बारा किलोमीटर धावेल, असे 2018 मध्ये जाहीर केले होते. कोरोनाची साथ 2020 मध्ये आली. त्यामुळे सर्वच कामे ठप्प झाली. त्यामुळे मेट्रोची कामे रेंगाळण्यास निमित्त मिळाले. पिंपरी आणि कोथरूड येथील दोन्ही मार्गांवर मेट्रो गेल्या वर्षी मार्च 2022 ला बारा किलोमीटर धावू लागली. पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

मेट्रो डिसेंबर 2022 पर्यंत न्यायालयापर्यंत धावू लागेल, असे महामेट्रोतर्फे गेल्या दिवाळीच्या सुमारास सांगण्यात आले होते. त्यानंतर पालकमंत्र्यांनी नोव्हेंबरमध्ये मेट्रोच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली. गरवारे महाविद्यालय ते न्यायालय आणि फुगेवाडी ते न्यायालय या मेट्रो मार्गाचे काम 26 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली. तसेच, पुण्यातील 33 किलोमीटर लांबीचे दोन्ही मेट्रो मार्ग मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे पाटील यांनी पत्रकारांना सांगितले होते.

मेट्रोने या मार्गावरील चाचणी डिसेंंबरमध्ये घेतली. त्या वेळी गरवारे महाविद्यालयापासून न्यायालयापर्यंत उन्नत मार्गावरून मेट्रो धावली. तसेच, रेंजहील्सपासून न्यायालयापर्यंतची भुयारी मार्गावरील मेट्रोचीही चाचणी झाली. मात्र, न्यायालयाजवळील इंटरचेंज मेट्रो स्थानकाची कामे अद्याप झालेली नाहीत. ती कामे फेब्रुवारीमध्ये पूर्ण होतील.

त्या वेळी त्याची केंद्रीय संस्थेकडून तपासणी केली जाईल, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी गेल्या आठवड्यात सांगितले. त्यामुळे मेट्रो मार्चमध्ये धावू शकेल, हे स्पष्ट झाले. त्यानंतर, न्यायालयापासून पुढे रामवाडीपर्यंत मेट्रो धावण्यास आणखी काही महिने लागतील, तर वर्षअखेरपर्यंत स्वारगेटपर्यंत भुयारी मेट्रो धावण्याची शक्यता आहे.

Back to top button