नानगाव (दौंड), पुढारी वृत्तसेवा: दौंड तालुक्यातील पारगाव सा. मा. येथील भीमा नदीपात्रात ८ ते २४ जानेवारी दरम्यान दोन कुटुंबातील सात जणांचे मृतदेह सापडले आहेत. आई, वडील, मुलगी, जावई आणि तीन नातवांचा यामध्ये समावेश आहे. हा घातपात आहे की आणखी काही याची चर्चा परिसरात सुरू आहे. फुलवरे आणि पवार कुटुंबातील हे मृतदेह आहेत.
मंगळवार २४ जानेवारी रोजी दुपारी रितेश शामराव फुलवरे (वय अंदाजे ७ ते ८ वर्ष), छोटू फुलवरे (वय अंदाजे पाच वर्ष) तर कृष्णा फुलवरे (वय अंदाजे तीन वर्ष) या मुलांचे मृतदेह सापडले आहेत. १८ ते २४ जानेवारी रोजी दुपारी एक वाजेपर्यंत पारगाव सा. मा. (ता. दौंड) येथील भीमा नदीपात्रात मोहन उत्तम पवार (वय अंदाजे ५० वर्ष), संगीता मोहन पवार (वय अंदाजे ४५ वर्ष), शामराव पंडित फुलवरे (वय अंदाजे ३२ वर्ष), राणी शामराव फुलवरे (वय अंदाजे २७ वर्ष) आणि रितेश शामराव फुलवरे (वय ७ वर्ष) यांचे मृतदेह भीमा नदीपात्रात आढळून आले.
याबाबत नातेवाईकांनी अशी माहिती दिली की, मृत मोहन पवार व संगीता पवार हे मृत शामराव फुलवरे यांचे सासू- सासरे आहेत. तसेच शामराव व राणी फुलवरे यांना तीन मुले असून मंगळवारी दुपारी सापडलेले तीन मुलांचे मृतदेह हे मयत शामराव फुलवरे यांच्या मुलांचे आहेत. मोहन पवार हे खामगाव (ता. गेवराई, जि. बीड) येथील असून शामराव फुलवरे हे येळंब (ता. जि. बीड) येथील आहेत. सध्या हे सर्व जण कामधंद्यामुळे निघोज (ता. शिरूर) येथे रहात होते, अशी माहिती शामराव फुलवरे यांचे मेव्हुणे दीपक शिंदे यांनी दिली. मृतदेह सापडण्याच्या या सत्रामुळे पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. २३ जानेवारी रोजी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी भीमा नदीपात्रातील ठिकाणी भेट देऊन पहाणी केली. यवतचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे व पोलिस कर्मचारी या वेळी उपस्थित होते.
मंगळवारी दुपारी बारा ते एक वाजण्याच्या सुमारास मयत रितेश शामराव फुलवरे (वय अंदाजे ७ वर्ष) याचा मृतदेह अढळून आला असून शोध पथकाने मृतदेह बाहेर काढल्यानंतर हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. त्यानंतर इतर दोन मुलांचे मृतदेह नदीपात्रात सापडले. घडलेल्या घटनेच्या संदर्भात ठिकठिकाणी तपास आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे, असे यवतचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सांगितले.
भीमा नदीपात्रातील मृतदेह शोधण्यासाठी पीएमआरडीए अग्निशामक पथकाचे मुख्य अग्निशामक अधिकारी देवेंद्र पोटफोडे, डीएफओ सुजित पाटील, स्टेशन अधिकारी विजय महाजन, ओंकार पाटील, सचिन गवळी, अक्षय नेवसे, प्रकाश मदने, अभिजित दराडे, विकास पालवे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
घडलेल्या या घटनेमध्ये घातपाताची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी याचा सखोल तपास करावा. जोपर्यंत तपास होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही.
– दीपक शिंदे, मयत शामराव फुलवरे यांचे मेव्हुणे