बालकांच्या ह्रदय शस्त्रक्रियांमध्ये पुणे जिल्हा आघाडीवर, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत होतात मोफत उपचार | पुढारी

बालकांच्या ह्रदय शस्त्रक्रियांमध्ये पुणे जिल्हा आघाडीवर, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत होतात मोफत उपचार

पुणे, पुढारी वृत्तसेवा: कॅन्सर, ह्रदय, किडनीशी आदींशी संबंधित गुंतागुंतीच्या आजारांवरील शस्त्रक्रिया आणि उपचार राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत (आरबीएसके) मोफत केल्या जात आहेत. कार्यक्रमाअंतर्गत सर्वाधिक ह्रदय शस्त्रक्रिया पुणे जिल्ह्यात करण्यात आल्या आहेत. आरबीएसकेमध्ये एप्रिल ते डिसेंबर 2022 या कालावधीत 210 मुलांच्या शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम राबवण्यासाठी पुणे जिल्ह्याअंतर्गत 73 आरोग्य तपासणी पथके कार्यरत आहेत. तपासणीदरम्यान आढळलेले आजार, समस्या समजून घेऊन त्यावरील उपचार आणि शस्त्रक्रियांसाठी पाठपुरावा केला जातो. या अंतर्गत 2019 पासून विविध रुग्णालयांशी सामंजस्य करार करुन 2018 ते 2022 या कालावधीत 800 हून अधिक ह्रदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

पथकांमार्फत गरजू विद्यार्थ्यांच्या पालकांकडून विनंती अर्ज आणि इतर कागदपत्रे जमा करुन घेतली जातात. जिल्हा रुग्णालयाकडून प्रस्ताव आल्यावर जिल्हा परिषदेच्या सीईओंची मान्यता घेतली जाते आणि संबंधित रुग्णालयाला शस्त्रक्रियेबाबत सूचना दिल्या जातात. रुग्णालयाकडून आलेल्या बिलाची रक्कम शासनाकडून अदा केली जाते. पालकांना एकही रुपया भरण्याची गरज भासत नाही. दर वर्षी जास्तीत जास्त मुलांपर्यंत उपचार पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातो.

काय आहे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम?

यामध्ये अंगणवाडी स्तरावरील 0 ते 18 वयोगटातील ग्रामीण व शहरी भागातील बालकांची आरोग्य तपासणी वर्षातून दोन वेळा करण्यात येते. शालेय स्तरावरील मुलांची तपासणी वर्षातून एक वेळा होते. तपासणीदरम्यान आढळून येणार्‍या मुलांमधील जन्मत: व्यंग, जीवनसत्त्वाच्या कमतरतेअभावी होणारे आजार आदींचे निदान केले जाते. ज्यांना मोठे उपचार किंवा शस्त्रक्रियांची गरज आहे, अशा बालकांवर योजनेतून मोफत उपचार करण्यात येतात.

कुठे होतात शस्त्रक्रिया?

आरबीएसकेमधील संदर्भ सेवा निधीमधून पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, बुधराणी हॉस्पिटल, मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालय व फोर्टिस रुग्णालय अशा ठिकाणी शस्त्रक्रिया पार पडतात.

आरबीएसके कार्यक्रमाअंतर्गत पथकामार्फत उपजिल्हा, ग्रामीण व जिल्हा रुग्णालयात आरोग्य शिबिराचे आयोजन करून मोफत आरोग्य सेवा दिल्या जातात. 2013 ते आतापर्यंत 1500 हून जास्त जणांवर हृदयशस्त्रक्रिया, तर इतर प्रकारच्या मिळून 8 हजारांहून अधिक उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
– डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक, पुणे

 

 

Back to top button