पुणे: कोयत्याचा वार होत असतानाच आता गोळीचा बार, सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत विकासकाकडून गोळीबार | पुढारी

पुणे: कोयत्याचा वार होत असतानाच आता गोळीचा बार, सिंहगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत विकासकाकडून गोळीबार

पुणे/धायरी, पुढारी वृत्तसेवा: शहरात एकीकडे कोयत्याचा वार होत असतानाच आता गोळीचा बार पुणेकरांना अनुभवायला मिळत आहे. सिंहगड पोलिस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर सनसिटी रोडवर एका पोलिस संरक्षण असलेल्या विकसकाने पिस्तूलातून त्यांच्याच समजातील एकावर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी दुपारी सव्वा बारा वाजता घडला. भर दुपारी घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. रमेश राठोड (वय ३६) असे या गोळीबारात जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी गोळीबार करणारा विकसक संतोष पवार (वय ३५) याला सिंहगड रोड पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

सिंहगड पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावरच मागील बाजूस सनसिटी रोड आहे. तेथेच श्री योगीराज सर्विस हे राजाभाऊ चव्हाण यांचे गॅरेज आहे. मंगळवारी दुपारी संतोष पवार आणि रमेश राठोड राजाभाऊ यांच्या गॅरेजवर आले होते. त्यांच्यात व्हाट्सअपवरील चॅट वरून वाद सुरू होते. या वादाचे रूपांतर भांडणात झाले. संतोष पवार याला राग अनावर झाल्याने त्याने त्याच्या कमरेला लावलेले पिस्तूल काढून रमेश राठोड याच्या पायावर तीनदा फायरिंग केले. या हल्ल्यात रमेश राठोड गंभीर जखमी झाले आहेत. राठोड यांना तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे. यावेळी पवार यांच्याबरोबर असलेल्या अंगरक्षक पोलिसाने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु, तरीही त्याने फायरिंग केल्याचं तपासात निष्पन्न झाले आहे.

संतोष पवार हा मोक्क्याच्या एका गुन्ह्यामध्ये पुण्यात फिर्यादी आहे. म्हणून त्याला पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. तसेच तो परवाना असलेले पिस्तुल वापरत होता. याच पिस्तूलातून त्याने गोळीबार केल्याचा प्रकार घडला. घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा, सहायक पोलिस आयुक्त रमेश गलांडे घटनास्थळी भेट दिली. या ठिकाणी न्यायवादी प्रयोगशाळेचे कर्मचारी देखील दाखल झाले आहे.

Back to top button