

खोर; पुढारी वृत्तसेवा : ग्रामीण भागातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत. समाजातील महिलांचे स्थान हे मोलाचे आहे. त्यांना सन्मानाने वागणूक दिली पाहिजे, असे मत महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केले आहे. वरवंड (ता. दौंड) येथे चंद्रभागा महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या 10 व्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी चाकणकर बोलत होत्या. या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता. चाकणकर म्हणाल्या की, महिलांना व मुलींना कोण त्रास देत असेल, तर महिला आयोगा कडे तक्रार दाखल करा.कोरोना काळात मोठ्या प्रमाणावर कुटुंब उद्ध्वस्त होताना पाहिले जसा आजार आला, तसा गेला; पण अनेकांना जीव गमवावा लागला.
कित्येक महिलांना त्यांचा कर्तामाणूस गेल्याने दुःख झाले आहे. ज्या महिलेच्या पतीचे निधन झाले आहे, त्यांना समाजात वावरताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आहे. येणार्या ग्रामसभेला विधवाप्रथा व गावात बालविवाह कायदा याचा ठराव करण्यात यावा. महिलांना कोणी त्रास देत असेल, तर कुटुंब हिंसाचार, अंधश्रद्धाच्या विरोधात, जर कोणी कसलाही त्रास देत असेल, तर आमचाशी संपर्क साधावा.
या वेळी चंद्रभागा पतसंस्थेच्या अध्यक्ष योगिनी दिवेकर यांचे चाकणकर यांनी कौतुक केले आहे. या वेळी महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम, होम मिनिस्टर कार्यक्रम घेण्यात आला आहे.
या वेळी महिलांना आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती. या वेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर, वैशाली नागवडे, योगिनी दिवेकर, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस डॉ. विजय दिवेकर, अभिनेत्री सायली जाधव, अभिनेत्री प्रिया पानसरे, सरपंच मीनाक्षी दिवेकर, मंदाकिनी खोमणे, अर्चना रणधीर, संगीता सातपुते, चंद्रभागा पतसंस्था संचालिका, वरवंड ग्रामशिक्षण संस्था सर्व शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते.