मराठ्यांच्या पराक्रमाला मानाचा मुजरा! पुरंदर ते पानिपतदरम्यान सायकल यात्रा | पुढारी

मराठ्यांच्या पराक्रमाला मानाचा मुजरा! पुरंदर ते पानिपतदरम्यान सायकल यात्रा

हडपसर; पुढारी वृत्तसेवा : देशाच्या 75 व्या अमृतमहोत्सवानिमित्त आणि मराठ्यांच्या शौर्य व पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा करण्यासाठी पुरंदर सायकलिस्ट क्लबच्या वतीने पुरंदर ते पानिपत (हरियाना) या सायकल मोहिमेचे नुकतेच आयोजन केले होते. वातावरणातील बदल, कडाक्याची थंडी यांची पर्वा न करता या सायकलस्वरांनी ही मोहीम पूर्ण केली. पानिपत शौर्यदिनानिमित्त गेल्या 3 जानेवारी रोजी या मोहीमेस सुरुवात करणात आली. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब व हरियाना या पाच राज्यांतून प्रवास करीत हे सायकलस्वार गेल्या 14 जानेवारी रोजी पानिपत येथे युद्ध स्मारकात दाखल झाले. हडपसर व साडेसतरानळी परिसरातील सायकलस्वार या मोहिमेत सहभागी होते.

या मोहिमेची 17 जानेवारी रोजी अट्टारी वाघा बॉर्डर, अमृतसर, पंजाब येथे भारतभूमीच्या रक्षणार्थ शहीद झालेल्या जवानांना मानवंदना देऊन सांगता करण्यात आली. पानिपत मोहिमेसाठी पुरंदर, कापूरव्होळ, सासवड, हडपसर, फुरसुंगी, चंदननगर, विश्रांतवाडी, तसेच पुणे शहरातून एकूण 20 सायकलस्वार या मोहिमेत सहभागी झाले होते. पानिपत गौरवगाथा मोहिमेसाठी इंडो एशियाटिक सोसायटी विश्वस्त गजानन खैरे, गणेश भुजबळ, अजित पाटील यांचे विशेष सहकार्य मिळाले.

पानिपत मोहिमेत सायकलस्वार संतोष झेंडे, मनोज मेमाणे, सुहास गदादे, प्रसन्न कुलकर्णी, अनिल सणस, रमेश झेंडे, विजय हिंगे, अमित तुपे, दीपक जांभळे, अनिल झेंडे, दिलीप झेंडे, धनंजय टिळेकर, अविनाश झेंडे, सौरभ दुमे, अमोल वढणे, ललित वाल्हेकर, महेश बडघे, राहुल घुले, सुजित बाठे, जयसिंग गायकवाड सहभागी झाले. या मोहिमेते असणार्‍या सायकलस्वरांचे विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले.

Back to top button