पीएम श्री योजनेसाठी होणार शाळांची निवड ! केंद्राकडे शिफारस करण्यासाठी उद्यापर्यंत मुदत | पुढारी

पीएम श्री योजनेसाठी होणार शाळांची निवड ! केंद्राकडे शिफारस करण्यासाठी उद्यापर्यंत मुदत

गणेश खळदकर

पुणे : भारत सरकारने 65 हजार शाळांपैकी 16 हजार 219 शाळांची यादी तयार केली होती. या शाळांपैकी 14 हजार 500 हून अधिक आदर्श शाळा विकसित करण्यात येणार आहे. यामध्ये राज्यात ग्रामीण भागातील 5 हजार 804, तर शहरातील 960 अशा एकूण 6 हजार 764 पात्र शाळांमधून पीएम श्री योजनेसाठी शाळांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या 25 जानेवारीपर्यंत केंद्र सरकारकडे शिफारस करावी लागणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी दिली आहे.

पगारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात केंद्रपुरस्कृत पीएमश्री स्कूल योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी पीएम श्री योजनेंतर्गत शाळांची नोंदणी करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याअनुषंगाने शाळांने नोंदणी केली असून, पात्र ठरलेल्या शाळांची पडताळणी जिल्हास्तरावरून करण्यात आली. पात्र ठरलेल्या शाळांपैकी प्रत्येक गट/शहर साधन केंद्रातून प्राथमिक स्तरावरील पहिली ते आठवीमधील एक आणि पहिली ते बारावीमधील एक अशा 2 किंवा माध्यमिक व उच्च माध्यमिकस्तरावरील शाळा उपलब्ध नसल्यास प्राथमिकस्तराच्या 2 शाळांची राज्यस्तरावरून केंद्र सरकारकडे 25 जानेवारीपूर्वी शिफारस करणे गरजेचे आहे.

पात्र शाळांमधून सर्वांत जास्त पटसंख्या असलेली शाळा, भविष्यात शाळेची प्रगती करण्याच्या दृष्टीने जागा उपलब्ध असणे, पटांगण उपलब्ध असणे आदी निकषांचा विचार करून शाळांची निवड करून समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडे 24 जानेवारीपर्यंत पाठविण्यात यावे. शाळांची निवड करताना राज्य शासनाने निवड केलेल्या आदर्श शाळा वगळण्यात याव्यात, असे निर्देश राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महानगरपालिकांच्या आयुक्तांना
दिले आहेत.

काय आहेत योजनेची उद्दिष्टे
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणार्‍या शाळा विकसित करणे.
देशात 14,500 हून अधिक उत्कृष्ट शाळातयार करणे
सर्वसमावेशक, समाजोपयोगी आणि समाजाप्रती योगदान देणारे नागरिक घडविणारे विद्यार्थी तयार करणे.
वेगवेगळ्या शिक्षणपद्धतीचा अवलंब करून विद्यार्थ्यांना अनुभवात्मक पद्धतीने आनंददायी शिक्षण देणे.
व्यावसायिक शिक्षणासाठी कौशल्य आधारित अभियोग्यता शिक्षण देणे.
या शाळांनी शिक्षणात अग्रेसर म्हणून कामगिरी पार पाडतील आणि कालांतराने
शेजारच्या शाळांना या शाळेचे अनुकरण करण्यासाठी मार्गदर्शन करणे.

 

 

Back to top button