

मंचर; पुढारी वृत्तसेवा : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर (ता. आंबेगाव) एस. टी. बसस्थानकासमोर मालवाहू ट्रकचा पाटा तुटल्याने चालकाच्या बाजूचे चाक निखळले. त्यामुळे ट्रक फरफटत दहा ते बारा फूट गेला. या वेळी रस्त्यावरून अनेक वाहने ये-जा करीत होती. मात्र, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे वाहतूक कोंडी झाली होती. दुपारी साडेबाराच्या सुमारास मंचरहून पुण्याच्या दिशेला जाणार्या ट्रकचे चाक निखळल्यामुळे अन्य वाहनचालक गोंधळून गेले. त्याचवेळी बसस्थानकातून एक एसटी बस बाहेर पडत होती. बसचालकाने प्रसंगावधान राखून गाडी थांबवली. पुण्याहून येणार्या तीन ते चार कारही जागेवरच थांबल्या. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या प्रकारामुळे येथे वाहतूक कोंडी झाली होती. बघ्यांची गर्दीही झाली होती.
या घटनेची माहिती समजताच मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर, वाहतूक विभागाचे गणेश येळवंडे, सोमजित गवारी, संपत काळभोर, गणेश मांदळे घटनास्थळी आले. त्यांनी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रयत्न केले. क्रेनच्या साहाय्याने मालट्रक हलविण्यात आला. दीड तासानंतर वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत झाली. गुरुवारी (दि. 26) प्रजासत्ताक दिन असल्याने रस्त्यावरील वाहनांची गर्दी लक्षात घेऊन खेड ते सिन्नर महामार्ग मंचर बाह्यवळण रस्ता दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी मंचर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य वसंतराव बाणखेले आणि प्रशांत बागल यांनी केली आहे.