चाकूचा धाक दाखवत लोणावळ्यात दोघांना लुटले | पुढारी

चाकूचा धाक दाखवत लोणावळ्यात दोघांना लुटले

लोणावळा : सहारा पुलावर फिरायला गेलेल्या दोघांना चाकूचा धाक दाखवत लुटल्याची घटना रविवारी रात्री घडली. तर, दुसर्‍या घटनेत टेबल लॅन्ड परिसरात रेल्वे ट्रॅकजवळ लोणावळ्यातील एका युवकावर अनोळखी व्यक्तीने चाकू हल्ला केला आहे. या प्रकरणी लोणावळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिल्या घटनेत सलमान उस्मान खान (वय 19, रा. टेबल चाळ, जी. वार्ड, लोणावळा) याने फिर्याद दिली आहे. सलमान व त्याची मैत्रिण हे रविवारी रात्री लोणावळा ब्रीजच्या पुढे फिरायला गेले असताना त्याठिकाणी असलेल्या तीन अनोळखी व्यक्तीनी त्यांना चाकूचा धाक दाखवला.

तसेच, सलमान याच्या हातावर चाकूने वार करून गंभीर जखमी करत त्याच्या जवळील आय फोन, त्याच्या मैत्रिणीकडील सोन्याची दोन तोळ्याची चेन व चांदीची अंगठी असा 1 लाख 12 हजार 400 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. सलमान याने दिलेल्या फिर्यादीवरून सदर प्रकरणी लोणावळा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसर्‍या घटनेत तुम्ही या रस्त्याने पुढे जायचे नाही, असे म्हणत टेबल लॅन्ड येथे रेल्वे ट्रॅकजवळ एका युवकावर चाकू हल्ला झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी अमित सलेंदर चौरसिया (वय 28, रा. पांगोळी, लोणावळा. मूळ रा. खलिलाबाद, उत्तर प्रदेश) यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी अमिय चौरसिया हे टेबल लँड जवळून जात असताना 25 ते 30 वयोगटातील अनोळखी युवकाने तुम्ही या रस्त्याने जायचे नाही, असे म्हणत फिर्यादीवर चाकूने वार करत गंभीर जखमी केले.

Back to top button