वडगाव मावळ : चुकीच्या वक्तव्यांमुळे सुसंस्कृत महाराष्ट्र हरवला; खासदार सुनील तटकरे यांची खंत | पुढारी

वडगाव मावळ : चुकीच्या वक्तव्यांमुळे सुसंस्कृत महाराष्ट्र हरवला; खासदार सुनील तटकरे यांची खंत

वडगाव मावळ : अलीकडच्या काळात सत्तेच्या नादात राजकारण्यांची निष्ठा, विश्वास झपाट्याने बदलत गेल्याचे दिसत आहे. महापुरुषांबाबत वारंवार होणार्‍या चुकीच्या वक्तव्यांमुळे सुसंस्कृत महाराष्ट्र हरवला असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. अशा संक्रमणाच्या काळात कार्यकर्त्यांना एकसंध राहण्याचा विचार कार्यकर्ता शिबिराच्या माध्यमातून मिळत असल्याचा विश्वास खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्या नेतृत्वाखाली कामशेत येथे संपन्न झालेल्या कार्यकारिणी शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. या वेळी माजी मंत्री मदन बाफना, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, विठ्ठलराव शिंदे, बाबूराव वायकर, सुभाषराव जाधव, सचिन घोटकुले, दीपक हुलावळे, साहेबराव कारके, संदीप आंद्रे, युवक अध्यक्ष किशोर सातकर, महिलाध्यक्षा दीपाली गराडे आदी उपस्थित होते.

आता निवडणूक झाली, तर राष्ट्रवादी एक नंबरचा पक्ष असेल
या वेळी खासदार तटकरे यांनी बोलताना पक्षनेते शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत घेतलेल्या वेगवेगळ्या यशस्वी भूमिका, वेळोवेळी झालेले राजकीय स्थित्यंतरे, सत्तांतर तसेच अलीकडच्या काळात सत्तेसाठी सुरू असलेला खेळ याविषयी मार्गदर्शन केले. अशा संक्रमणाच्या काळात फक्त राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत विचारधारेने काम करत असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जाणीवपूर्वक लांबविल्या जात असलेल्या निवडणुका सरकारने घ्याव्यात, असे जाहीर आव्हान केले. या निवडणुका झाल्या तर राष्ट्रवादी एक नंबरला असेल, असा विश्वास व्यक्त केला.

…तेव्हा सुनील शेळके उलटा प्रवास करत होते
राज्यात भाजपचे 40 पेक्षा जास्त खासदार निवडून आले होते, त्यामुळे राज्यात भाजपची एकहाती सत्ता येण्याची चिन्हे दिसत होती. याचा परिणाम म्हणून राष्ट्रवादीचा एक एक जण सोडून जात होता, पण अशा वेळी सुनील शेळकेंचा मात्र उलटा प्रवास सुरू होता. ते भाजप सोडून राष्ट्रवादीत आले आणि मोठ्या मताधिक्याने विजयी झाले, अशी आठवण खासदार तटकरे यांनी करून दिली.

यापूर्वी मावळ तालुक्यात पक्षाची राष्ट्रीय, राज्य पातळीवर शिबिरे झाली. परंतु, तालुकास्तरीय कार्यकर्त्यांचे अशा प्रकारचे शिबिर हे पहिल्यांदाच झाले आहे. या शिबिराला पक्षाचे चार विभाग व 18 सेल मधील सुमारे 80 टक्के पदाधिकारी उपस्थित होते. प्रामुख्याने महिला पदाधिकार्‍यांचा सहभाग लक्षणीय होता.
– गणेश खांडगे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

अशा शिबिरांमुळे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना योग्य मार्गदर्शन मिळून भविष्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल भक्कमपणे यशस्वीतेकडे अशीच सुरू राहील. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी आजी-माजी पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे. मावळ तालुक्यातील पक्ष संघटना सक्षम झाली असून आगामी निवडणुकांसाठी सज्ज आहे.
– सुनील शेळके, आमदार

Back to top button