शेकोटी करत बसलेल्या तरुणांनी कहा के हो विचारताच, पुढे जे घडलं ते भयंकरच! | पुढारी

शेकोटी करत बसलेल्या तरुणांनी कहा के हो विचारताच, पुढे जे घडलं ते भयंकरच!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शेकोटी करीत बसलेल्या तरुणांनी कहा के हो असे विचारल्याने एका व्यावसायिकाने त्यांच्यावर गोळीबार केला. ही घटना कल्याणीनगरमध्ये सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी खूनाचा प्रयत्न, अणि चोरी, मारहाण केल्याचा असे दोन गुन्हे दाखल केले आहेत. अमित सत्यपाल सिंग (वय ३१, रा. कल्याणीनगर) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अमित सिंग यांचा आईस्क्रीमचा बँड आहे. त्यांची हडपसरला फॅक्टरी आहे. ते सिलीकॉन येथे राहतात. सोमवारी रात्री ११ वाजता जेवण करुन ते बाहेर फिरायला गेले होते. तेथील रस्त्याच्या शेवटी एका ठिकाणी काही तरुण शेकोटी करुन शेकत बसले होते.

सिंग हेही काही वेळ तेथे गेले. तेव्हा त्यांना या तरुणांनी कहा के हो, अशी विचारणा केली. त्यानंतर ते परत आले. त्यांनी आपली कार काढून हे तरुण नेमके कोण आहेत, याची माहिती घेण्यासाठी ते तिकडे गेले. त्यावेळी या तरुणांनी त्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ते कार मधून बाहेर आले असताना या तरुणांनी त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्वरक्षणार्थ हवेत फायर केले. त्यावेळी झालेल्या झटापटीत आपली सोन्याची चैन गहाळ झाली असून या तरुणांनी गाडीच्या काचा फोडल्याचे अमित यांनी तक्रारीत म्हटले आहे.

त्या विरोधात नवनाथ गलांडे यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आम्ही काही जण शेकोटी करुन शेकत बसलो असताना अमित सिंग तेथे आले. त्यांना भैय्या कहा के हो अशी विचारणा केल्याचा त्यांना राग आला आणि ते तिथून निघून गेले. काही वेळाने ते पुन्हा कार घेऊन आले. त्यांनी एकाला बोलावून त्याच्यावर पिस्तुल रोखले. तेव्हा त्यांनी त्यांचा हाथ धरल्याने पिस्तुलातून वर गोळी झाडली गेली. त्यानंतर ते गाडी सोडून पळून गेले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी चौकशी करुन दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत.

Back to top button