तळेगाव ढमढेरे येथे वृद्ध दाम्पत्यावर खुनी हल्ला; सराफी दुकानात जाऊन मारहाण | पुढारी

तळेगाव ढमढेरे येथे वृद्ध दाम्पत्यावर खुनी हल्ला; सराफी दुकानात जाऊन मारहाण

तळेगाव ढमढेरे(ता. शिरूर); पुढारी वृत्तसेवा : तळेगाव ढमढेरे  येथील महेंद्र जयंतीलाल शहा या सोनार दुकानात सोमवारी (दि. 23) सायंकाळी 7.30 च्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने वृद्ध दाम्पत्यावर खुनी हल्ला करून त्यांना जखमी केले. याबाबत राहुल महेंद्र शहा यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी 7.30च्या दरम्यान ज्वेलरी दुकानाचे मालक महेंद्र जयंतीलाल शहा व त्यांची पत्नी सरिता शहा या दुकान बंद करत होत्या.

या वेळी दुकानच्या छोट्या प्रवेशद्वारातून अज्ञात व्यक्तीने आत येऊन शहा दाम्पत्यावर कोणत्यातरी हत्यारसदृश्य वस्तूने मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये सरिता शहा गंभीर जखमी झाल्या. या वेळी दोघांनी आरडाओरडा केला त्यांच्या आवाजाने शेजारी नागरिक जमा होऊ लागले. त्यामुळे अज्ञात हल्लेखोर दुकानच्या मागील बाजूस असणार्‍या कुलूपबंद दरवाजाची किल्ली घेत पसार झाला.

विशेष म्हणजे यामध्ये दुकानात असणारा ऐवज, वस्तू, पैसे चोरीला गेले नाही. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलिस उपनिरीक्षक नितीन अतकरे, पोलिस हवालदार किशोर तेलंग, अमोल चव्हाण, अंबादास थोरे, संतोष शिंदे, रोहिदास पारखे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, या घटनेची माहिती गावामध्ये वार्‍यासारखी पसरली. विशेष म्हणजे या घटनेत सोनाराचे दुकान असूनही कोणताही ऐवज, वस्तू, पैसे चोरीला गेले नाहीत. यावरून पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

Back to top button