पुणे : पीएमपीला ब्रेकडाऊनचे ग्रहण; 15 दिवसांत 431 गाड्यांची चाके जागेवरच

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गेल्या पंधरा दिवसांतच पीएमपीच्या ताफ्यातील 431 बस ब्रेकडाऊन झाल्या आहेत. यात ठेकेदारांच्या भाडेतत्त्वावरील बस सर्वाधिकब्रेकडाऊन होत असल्याचे समोर आले आहे. पीएमपीच्या ताफ्यात 2 हजार 142 बस आहेत. त्यापैकी 1,650 ते 1750 बस दररोज मार्गावर असतात. इतर बस देखभाल दुरुस्ती आणि ब्रेकडाऊनमुळे डेपोमध्येच उभ्या असतात. त्यामुळे अगोदरच बसची कमतरता असताना ब्रेकडाऊनमुळे पुणेकरांना वेळेवर बस उपलब्ध होत नाहीत. त्यासोबतच रस्त्यात बस बंद पडल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. यामुळे पीएमपी प्रशासनाने पीएमपीच्या ब्रेकडाऊन होणार्या बसचे प्रमाणे शून्य करावे, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
देखभाल दुरुस्तीवर प्रश्न…
पीएमपीच्या ताफ्यात स्वमालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील बस आहेत. यात स्वमालकीच्या बस जुन्या आहेत, तर ठेकेदारांच्या सर्वच्या सर्व बस नवीन आहेत. स्वमालकीच्या गाड्यांची वेळेत देखभाल दुरुस्ती होत असल्यामुळे त्यांचे प्रमाण कमी आहे, तर ठेकेदारांच्या नवीन असूनही सातत्याने रस्त्यात बंद पडलेल्या दिसतात. यामुळे जनमानसात पीएमपीचे हसू होत असून, ठेकेदारांच्या बसची वेळेत देखभाल दुरुस्ती होते की नाही, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.
पंधरा दिवसांतील ब्रेकडाऊनची संख्या…
(दि. 1 ते 15 जाने. 2023)
पीएमपी स्वमालकीच्याबस-136
ठेकेदारांच्या भाडेतत्त्वावरील बस-295
एकूण ब्रेकडाऊन-431