पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच | पुढारी

पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच

दिवे; पुढारी वृत्तसेवा : पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. सध्या महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणी सपाटीकरणासाठी साइडपट्ट्या उकरण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. वाहनांच्या प्रचंड वेगाने मागच्या काही दिवसांपूर्वी आजोबा व नातवाचा जीव गेला. अगदी त्याच ठिकाणी दोन दिवसांपूर्वी एका पादचार्‍याला रिक्षाने ठोकरले, तर रविवारी या मार्गावर वाहतुकीचा प्रचंड ताण असतो त्यामुळे रविवारी दोन अपघात झाले.

एक अपघात दिवे घाटात झाला. घाटातील गटारांना कठडे नसल्याने एक अज्ञात दुचाकीस्वार थेट गटारात पडला या अपघातात गाडीचे नुकसान झाले आहे, दुसरा अपघात हॉटेल शौर्य वाडासमोर जिथे मागच्या काही दिवसांपूर्वी मोठा अपघात झाला होता. अगदी त्याच ठिकाणी एका दुचाकीस्वाराला एका अज्ञात वाहनाने धडक दिली. वाहनचालक गाडीसह फरार झाला असून, दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. पालखी महामार्गाचे काम सुरू असल्याने वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी गतिरोधक बसवणे फार गरजेचे आहे जेणेकरून अपघातांच्या मालिकेला ब्रेक लागेल, अशी मागणी करण्यात येत आहे.

Back to top button