आता ठाकरे गटही चिंचवड पोटनिवडणुकीच्या आखाड्यात, निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी देणार | पुढारी

आता ठाकरे गटही चिंचवड पोटनिवडणुकीच्या आखाड्यात, निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी देणार

पुणे, पुढारी ऑनलाईन: चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लढवण्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पदाधिकारी आग्रही झाले आहेत. ठाकरे गट देखील पुण्यातील चिंचवडच्या पोटनिवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहे. आम्ही पोटनिवडणूक लढवण्यासाठी खूप आग्रही आहोत, पण शेवटी पक्षश्रेष्ठी निर्णय याचा निर्णय घेतील, असे ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले यांनी सांगितले आहे. महाविकास आघाडीबाबतही पक्षश्रेष्ठीच ठरवतील. परंतु आमची चिंचवड विधानसभा मतदारसंघात मोठी ताकद आहे. त्यामुळेच त्या ताकदीचा तुल्यबळ उमेदवार आम्ही या पोटनिवडणुकीत देणार असल्याचे सचिन भोसले यांनी म्हटलं आहे.

भाजपाचे दिवंगत आमदार आणि पिंपरी चिंचवडचे माजी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने चिंचवड विधानसभा पोटनिवडुक जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, आप या पक्षांनंतर आता ठाकरे गटाने देखील चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लढवण्यास आग्रही आहे. नुकतीच पिंपरी चिंचवडमधील ठाकरे गटाची बैठक पार पडली. चिंचवड विधानसभा ही आपण लढवावी, निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात यावी, असे मत कार्यकर्त्यांनी या बैठकीत मांडले असल्याची माहिती ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सचिन भोसले यांनी दिली आहे. शेवटी आमचे पक्षश्रेष्ठी ठरवतील. पण आम्ही मात्र, कामाला लागलो आहोत. जर महाविकास आघाडीचा उमेदवार दिला तर त्याचे काम करू, असे ही विधान भोसले यांनी केले आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शहरातील सर्वच पक्ष आग्रही आहेत. भाजपाकडून अद्याप ही चिंचवड विधानसभेचा उमेदवार जाहीर करण्यात आला नाही. भाजपकडून दिवंगत लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप किंवा बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

Back to top button