भारत जोडो नंतर आता काँग्रेसचे ​​’हात से हात जोडो’ अभियान सुरु, भाजप सरकार विरोधात आरोप पत्रही तयार करणार | पुढारी

भारत जोडो नंतर आता काँग्रेसचे ​​'हात से हात जोडो' अभियान सुरु, भाजप सरकार विरोधात आरोप पत्रही तयार करणार

पुणे, पुढारी वृत्तसेवा: राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभरात भारत जोडो यात्रा काढत आहे. मात्र, काँग्रेस इथेच थांबणार नसून भारत जोडो यात्रेदरम्यानच पक्ष देशभरात ‘हथ से हाथ जोडो’ अभियान सुरू करणार आहे. हे अभियान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे याच्या आदेशानुसार महाराष्ट्रात आजपासून सुरु करत असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

26 जानेवारीपासून हात से हात जोडो हे अभियान सुरू होणार आहे. या अभियानांतर्गत पक्षाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन लोकांशी संवाद साधून भारत जोडो यात्रेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत. या सोबतच काँग्रेसने मोदी सरकारविरोधात आरोपपत्रही तयार करण्यात आले असून ते लोकांपर्यंत पोहचवले जाणार आहे. तसेच राज्यांच्या प्रदेश काँग्रेस समित्याही आपापल्या राज्य सरकारांविरुद्ध आरोपपत्र तयार करणार आहेत. हात से हात जोडो अभियानांतर्गत काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपापल्या मतदारसंघातील मतदारांच्या घरी जाऊन त्यांना काँग्रेसची विचारधारा सांगणार आहेत. भारत जोडो यात्रेत दिलेला संदेश घराघरात पोहोचवला जाईल. या दरम्यान राहुल गांधी यांचे एक पत्र जनतेला दिले जाणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या त्रुटी सांगणारे आरोपपत्रही वितरित करण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत 26 जानेवारी ते 26 मार्च या कालावधीत देशातील 2.5 लाख ग्रामपंचायती आणि 6 लाख गावांपर्यंत पोहोचण्याचे काँग्रेस पक्षाचे उद्दिष्ट आहे.

पुढे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या राजीनाम्याच्या पत्राबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यपालांचे पत्र आपण वाचले तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे पत्र लिहले आहे. खरं तर राज्यपालांचा संबंध हा राष्ट्रपतींशी असतो. तसेच त्यांच्या काळात राज्यपाल भवनाचे भाजप भवन झाले आहे. भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्रातील महापुरुषांचा सतत अवमान केला. म्हणून त्यांचा राजीनामा न स्वीकारता त्यांची हकालपट्टीच झाली पाहिजे असेही पटोले म्हणाले.

उद्वव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीला शुभेच्छा

उद्वव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीवर बोलताना नाना पटोले यांनी म्हटलं की, आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. उद्धव आणि माझे आज फोनवरून बोलणे झाले. त्यांना मी सांगितले आहे की, प्रकाश आंबेडकर यांचा प्रस्ताव काय आहे? हे आधी समजू द्या, मगच कॉंग्रेस आपला प्रस्ताव देईल. आजची पत्रकार परिषद ही महाविकास आघाडीची नव्हती. काँग्रेसला अद्याप त्यांच्याकडून प्रस्ताव आलेला नाही, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी अनेक इच्छुक

कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षात अनेक इच्छुक उमेदवार आहेत. आतापर्यंत दहा जणांनी इच्छा बोलून दाखवली आहे. दोन- तीन फेब्रुवारीपर्यंत काँग्रेसचा उमेदवार जाहीर करण्यात येईल. महाराष्ट्र हे पहिल्यापासूनच आगळं वेगळे राज्य राहिलेले आहे. पोटनिवडणुकीसाठी कोल्हापूर, देगलूर, पंढरपूर या ठिकाणीही असाचा प्रयत्न झाला होता. कसब्यासाठी भाजपचा प्रस्ताव आला की बघु, अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली आहे.

Back to top button