पठाण चित्रपटावरून पुण्यातील संघटना आक्रमक; शिवाजीनगरमधील राहुल थेटरबाहेरील पोस्टर हटवले | पुढारी

पठाण चित्रपटावरून पुण्यातील संघटना आक्रमक; शिवाजीनगरमधील राहुल थेटरबाहेरील पोस्टर हटवले

पुणे, पुढारी ऑनलाईन: शहरात अभिनेता शाहरुख खानच्या पठाण चित्रपटावरून बजरंग दल आक्रमक झाले आहे. शिवाजीनगरमध्ये असणाऱ्या राहुल चित्रपटगृहाच्या बाहेरील पठाण चित्रपटाचे पोस्टर बजरंग दलाकडून काढण्यात आले आहे. हे पोस्टर शाहरुख खानच्या काही चाहत्यांनी चित्रपटगृहाबाहेर लावले होते. बजरंग दलानं राहुल थिएटरच्या मालकांना इशारा देऊन हे पोस्टर हटवण्याची विनंती केली. त्यानंतर चित्रपटगृहाबाहेरील हे पोस्टर हटवण्यात आलं आहे.

देशभरात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या पठाण चित्रपटाला हिंदुत्ववादी संघटना विरोध करत आहेत. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून पठाण चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी देखील केली जात आहे. पठाण या सिनेमातील ‘बेशरम रंग’ आणि ‘झुमे जो पठाण’ ही गाणी काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीस आली. यातील बेशरम गाण्यामधील दीपिका पादुकोणने घातलेल्या बिकिनीच्या रंगामुळे वाद निर्माण झाला होता. यानंतर दीपिकाच्या बिकिनीच्या रंगावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. तेव्हापासूनच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला.

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या मुख्य भूमिका असलेला पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे भारताव्यतिरिक्त स्पेन, यूएई, तुर्की, रशिया, सायबेरिया, इटली, फ्रान्स आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये चित्रीकरण झाले आहे. पठाण सिनेमा हा हिंदी, तमिळ आणि तेलगू या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आनंदने या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे.

 

Back to top button