पुणे : ज्वारी, बाजरी, गहू, मूगडाळ, पोहे, शेंगदाणा दरात मोठी वाढ | पुढारी

पुणे : ज्वारी, बाजरी, गहू, मूगडाळ, पोहे, शेंगदाणा दरात मोठी वाढ

पुणे : आवक कमी प्रमाणात होत असल्यामुळे गहू, ज्वारी, बाजरीच्या दरात गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. शेंगदाणा, कांदा पोहे आणि मूगडाळीचे दरही आणखी वाढल्याचे सांगण्यात आले. खाद्यतेलांचे दर मंदीतच आहेत, मात्र मागणी कमी झाल्यामुळे खोबरेल तेलाच्या दरात डब्यामागे 100 रुपयांनी घट झाली. हंगामाचा अखेरचा कालावधी सुरू झाला असून सध्या बाजारात सध्या गहू आणि ज्वारीचा तुटवडा जाणवत आहे. नवीन हंगाम सुरू होण्यास अद्याप महिन्याभराचा अवकाश आहे.

त्यातच अन्न महामंडळाकडील गव्हाची विक्री बंद असल्यामुळे गव्हाची चणचण निर्माण होऊन भाववाढ सुरू झाली आहे. गेल्या आठवड्याभरातच मिलबर तसेच अन्य गव्हाच्या दरात क्विंटलमागे सुमारे तीनशे रुपयांची दरवाढ झाली. गव्हाच्या दरवाढीमुळे आटा, रवा आणि मैद्याच्या दरातही वाढ झाली आहे. हिवाळा सुरू असल्यामुळे बाजरीस मागणी चांगली आहे मात्र आवक कमी असल्यामुळे बाजरीही क्विंटलमागे दोनशे रुपयांनी महागली. गावरान ज्वारीही क्विंटलमागे 200 ते 300 रुपयांनी महागल्याचे सांगण्यात आले.

भाताच्या दरवाढीमुळे कांदा पोह्यााचे दर क्विंटलमागे दोनशे रुपयांनी वाढले. आवक जावक साधारण असल्यामुळे तांदळाच्या दरात कोणताही फेरबदल आढळला नाही. अद्यापही नव्या तुरडाळीची अपेक्षित प्रमाणात आवक होत नसल्यामुळे तुरडाळीचा तुटवडा जाणवत असून दर पुन्हा एकदा तेजीकडे झुकले आहेत. आवक कमी असून मागणी चांगली असल्यामुळे मूग आणि मुगडाळीच्या दरात क्विंटलमागे 500 रुपयांनी वाढ झाली. कडधान्यांचे दर स्थिर होते.

तुटवड्यामुळे शेंगदाणा कडाडला
गुजरातमधून शेंगदाण्याची मोठ्या प्रमाणात निर्यात होत असून बाजारात तुटवडा निर्माण होऊन दर कडाडले आहेत. गेल्या आठड्यातही येथील घाऊक बाजारात हलक्या, मध्यम तसेच भारी प्रतीच्या शेंगदाण्याच्या दरात क्विंटलमागे आणखी 500 रुपयांनी वाढ झाली.
पुण्याच्या घाऊक बाजारातील दर :

साखर (प्रतिक्विंटल) 3450-3500 रु. खाद्यतेले (15 किलो/लिटर) :- शेंगदाणा तेल 2620-2720, रिफाईंड तेलः 2475-3250, सरकी तेल 1800-2150, सोयाबीन तेल 1800-2100 सूर्यफूल रिफाईंड तेल 1900-2100, तांदूळ :- गुजरात उकडा 3200-3500, मसुरी 3000-3300, सोनामसूरी 4000-4400, एच.एम.टी. कोलम 4500-5000, लचकारी कोलम 5500-6000, चिन्नोर 4500-5000, 1121-10000-11000, आंबेमोहोर (सुवासिक) 7000-8000, बासमती अखंड 11500-12000, बासमती दुबार 8500-9000, इंद्रायणी 4500-5000

गहू :- सौराष्ट्र लोकवन नं. 1 3900-4200, सौराष्ट्र लोकवन नं. 2 3500-3800, एम.पी. लोकवन 3300-3600, सिहोर नं. 1 5000-5600, सिहोर नं. 2 4200-4500, सिहोरी 3600-4200, मिलबर 3300-3400 रु. ज्वारी :- गावरान नं. 1-5400-5800, गावरान नं. 2-4900-5300, नं. 3 4400-4700, दूरी 3800-4200 रु. बाजरी :- महिको 3400-4000, गावरान 3500-3700, हायब्रीड 3050-3250 रु.
गूळ :- गूळ एकस्ट्रा 3800-4100, गूळ नं. 1 3450-3650, गूळ नं. 2 3200-3350, गूळ नं.3 3000-3150, गूळ नं. 4 2850-2950, बॉक्स पॅकिंग 3300-4700 रु.

डाळी :- तूरडाळ 1000-11000, हरभराडाळ 5800-5900, मूगडाळ 9500-10000, मसूरडाळ 7600-7700, मटकीडाळ 9500-9600, उडीदडाळ 8000-10000 रु. कडधान्ये :- हरभरा 5400-5500, हुलगा- 6000 चवळी 7500-8500, मसूर 6800-7000, मूग 8500-9000, मटकी गावरान 11500-12500, पोहे :- मध्य प्रदेश 4000-4400, पेण 4000-4300, मध्यम पोहा-3800-4300, दगडी पोहा 3800-4400, पातळ पोहा 4400-5200, सुपर पोहा 4400-4700.

मागणी वाढल्याने गूळ तेजीत
कडाक्याच्या थंडीमुळे उत्तर प्रदेशात गुळाचे उत्पादन मंदावले आहे. यामुळे गुजरात, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांकडून महाराष्ट्रातील दौंड भागात मागणी वाढली आहे. साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्यामुळे गूळ उत्पादकांना उसाची कमतरता जाणवू लागली आहे. आवक कमी प्रमाणात असून मागणी चांगली असल्यामुळे गेल्या आठवड्यात गुळाच्या दरात क्विंटलमागे 100 रुपयांनी वाढ झाल्याचे सांगण्यात आले. आवक जावक साधारण असल्यामुळे गेल्या आठवड्यातही साखरेच्या दरात कोणताही बदल आढळला नाही. शनिवारी येथील घाऊक बाजारात साखरेचा प्रती क्विंटलचा दर 3450 ते 3500 रुपये होता.

Back to top button