पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढविण्याचे राष्ट्रवादीकडून संकेत | पुढारी

पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढविण्याचे राष्ट्रवादीकडून संकेत

पिंपरी : चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक राष्ट्रवादीने लढवावी, अशी भूमिका शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी घेतली आहे. पक्षाच्या स्थानिक पदाधिकार्यांकडून याबाबत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे शनिवारी (दि. 21) साकडे घालण्यात आले. चिंचवड विधानसभेची निवडणूक बिनविरोध होईल, याविषयी शंका वाटत असल्याचे विधान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात केले आहे. त्यामुळे चिंचवड विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढविणार असल्याचे संकेत मिळत आहेत. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. चिंचवड आणि कसबा मतदारसंघात निवडणूक लढवावी, अशी इच्छा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे ही पोटनिवडणूक बिनविरोध होईल का, याबाबत मला शंका आहे, असे विधान अजित पवार यांनी पुणे येथे केले आहे.

शरद पवारांकडेही मागणी
राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे शनिवारी चिंचवड येथे आले असताना त्यांच्याकडे निवेदन देऊन चिंचवड येथील पोटनिवडणूक पक्षाकडून लढविण्यात यावी, अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकार्यांची शुक्रवारी याबाबत एक बैठक झाली. त्यामध्ये पोटनिवडणूक लढविण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. त्यासाठी पक्षश्रेष्ठींची परवानगी घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शनिवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे शहरात आले असताना स्थानिक पदाधिकार्यांनी त्यांची भेट घेतली. याबाबत शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले, चिंचवडच्या पोटनिवडणुकी संदर्भात शुक्रवारी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांची बैठक पार पडली.

त्यामध्ये पोटनिवडणूक राष्ट्रवादीने लढवावी, असे स्थानिक पदाधिकार्यांचे मत आहे. याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. पवार साहेबांना आमचे मत सांगितले आहे. तसेच, मागणीचे पत्र दिले आहे. वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल. निवडणूक लढविण्याबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय होण्याची अपेक्षा आहे. पक्षाकडे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी निवडून येऊ शकेल, अशी क्षमता असणारा उमेदवार आहे. त्यामुळे याबाबत सकारात्मक निर्णय होईल.

‘ते’ वक्तव्य दुहेरी
2019 ला सर्वांनी मिळून एक उमेदवार दिला होता. याबाबत विचारले असता गव्हाणे म्हणाले, यावेळी उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा असावा, अशी आमची सर्वांची मागणी आहे. तशी मागणी पक्षाकडे केली आहे. निवडणूक बिनविरोध होण्याबाबत आमदार अण्णा बनसोडे दुहेरी बोलेले आहेत. पक्षाचे सर्व नेते जो काही निर्णय घेतील, त्याबाबत आमदार बनसोडे बोलतील, असा विश्वास गव्हाणे यांनी व्यक्त केला.

Back to top button