वेल्हे : दळणवळण साधनाअभावी कोळवडीकरांचे हाल | पुढारी

वेल्हे : दळणवळण साधनाअभावी कोळवडीकरांचे हाल

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा : वेल्हे तालुक्यातील कोळवडी, कातवडी भागांतील विद्यार्थी, कामगार शेतकर्‍यांना दळणवळणाच्या साधनाअभावी हलाखीला तोंड द्यावे लागत आहे. विद्यार्थ्यांना चार ते पाच किलोमीटर अंतराची पायपीट करून शिक्षण घ्यावे लागत आहे. मुख्य रस्त्यावरील गावात पीएमपीएमएल तसेच एसटी गाड्या सुरू आहेत. मात्र, आडबाजूला असलेल्या कोळवडी, कातवडी भागांत एसटी गाड्या बंदच आहेत. या भागात आरोग्य, महसूल अशा सुविधाही उपलब्ध नाहीत.

सरकारी दवाखाने, विद्यालय, महाविद्यालय दूर अंतरावर आहेत. त्यासाठी पाच ते सहा किलोमीटर अंतराची पायपीट करून मुख्य रस्त्यावरून मिळेल त्या वाहनाने गरोदर माता, रुग्णांना ये-जा करावी लागत आहे. रस्ते चांगले झाले. मात्र, एसटी गाड्या बंदच आहेत. पूर्वीप्रमाणे कोळवडी, कातवडी भागांत एसटी बससेवा सुरू करावी, अशी मागणी स्थानिक कार्यकर्ते संतोष चोरघे यांनी केली आहे.
याबाबत एसटी महामंडळाच्या स्वारगेट आगार व्यवस्थापकांना नागरिकांनी निवेदन दिले आहे.

Back to top button