बारामतीच्या जिरायती भागातील माळरानाला वणवे | पुढारी

बारामतीच्या जिरायती भागातील माळरानाला वणवे

उंडवडी; पुढारी वृत्तसेवा : उंडवडी सुपेसह आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात माळरानावर तसेच वनक्षेत्रात व खासगी रानात मोठ्या प्रमाणात वणवे लागले आहेत. यात मोठ्या प्रमाणात सुका चारा जळाल्याने वन्यप्राणी तसेच जनावरांचा चारा मोठ्या प्रमाणात नष्ट झाल्याने चाराटंचाई निर्माण होणार आहे. याला जबाबदार कोण? असा सवाल आता गावकरी उपस्थित करीत आहेत.

सध्या हिवाळा संपून उन्हाळा सुरू होण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यात जिरायती भागात जसजसा उन्हाळा तापत जातो, तशी पिण्याच्या पाण्यासह चाराटंचाई भासू लागते. परंतु, चालू वर्षी जिरायती भागात पाऊस भरपूर झाल्याने आजतागायत ओढे-नाले यांना पाणी आहे. परंतु, जसा कडक उन्हाळा पडेल तशी या भागातील पाणीपातळी कमी पडते. त्यामुळे हिरवा चारा असो की सुका चारा, याची कमतरता जाणवते.

दरम्यान, या वर्षी बारामती तालुक्यातील जिरायती भागात मोठ्या प्रमाणात माळरानावर तसेच वनक्षेत्रात वणवे लागल्याने सुका चारा नष्ट झाला असून, उन्हाळ्यात सुका चारा मिळणार नसल्यामुळे येथील शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत. याला जबाबदार असणार्‍यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Back to top button