पुणे : ‘तंत्रशिक्षण’ विद्यार्थ्यांसाठी ‘व्हर्च्युअल लॅब’; विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे आवाहन | पुढारी

पुणे : ‘तंत्रशिक्षण’ विद्यार्थ्यांसाठी ‘व्हर्च्युअल लॅब’; विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे आवाहन

गणेश खळदकर

पुणे : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने 100 हून अधिक ‘व्हर्च्युअल लॅब’ मोफत उपलब्ध केल्या आहेत. त्याचा तंत्रशिक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. संबंधित लॅबविषयी तंत्रशिक्षण संस्थांच्या प्राचार्यांनी अधिव्याख्याते आणि विद्यार्थ्यांना सूचित करावे, असे निर्देश मंडळाचे सचिव डॉ. महेंद्र चितलांगे यांनी तंत्रशिक्षण संस्थांच्या प्राचार्यांना दिले आहेत.

डॉ. चितलांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हर्च्युअल लॅब प्रकल्प हा माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानाद्वारे राष्ट्रीय मिशन ऑन एज्युकेशनअंतर्गत भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचा एक उपक्रम आहे. हा प्रकल्प बारा सहभागी संस्थांचा संघटित उपक्रम असून, आयआयटी दिल्ली या संस्थेकडे समन्वयाची जबाबदारी आहे. व्हर्च्युअल लॅब प्रकल्पांतर्गत 700 हून अधिक वेब-सक्षम प्रयोगांचा समावेश असलेल्या 100 हून अधिक व्हर्च्युअल लॅब रिमोट-ऑपरेशन आणि प्रात्यक्षिके समजून घेण्यासाठी डिझाइन केल्या आहेत आणि विद्यार्थी व अध्यापकांसाठी मोफत उपलब्ध आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हर्च्युअल लॅबचा वापर विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी करण्यात आला होता. या व्हर्च्युअल लॅबची विद्यार्थ्यांसाठीची उपयोगिता लक्षात घेऊन व्हर्च्युअल लॅब प्लॅटफॉर्मवर उपलब्ध प्रयोगांचे मॅपिंग पदविका अभ्याक्रमातील प्रयोगांसोबत करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने संबंधित पदविका अभियांत्रिकी शाखांच्या आय स्कीम अभ्यासक्रमातील विषयानुसार उपलब्ध प्रयोगांची यादी तयार करून प्रयोग योग्य व्हर्च्युअल लॅबसह मॅप करून दिलेले आहेत.

मंडळाच्या विद्वत समितीने व्हर्च्युअल लॅब विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनासाठी सुयोग्य असून, त्यांचा वापर करण्यास मान्यता दिली आहे. तसेच, ज्या प्रयोगांकरिता सद्य:स्थितीत व्हर्च्युअल लॅब उपलब्ध नाहीत, त्या प्रयोगांकरिता आय. आय. टी. मुंबई व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे या संस्थेच्या समन्वयाने पदविका अभ्यासक्रमांकरिता मुख्यत्वेकरून अभियांत्रिकी, तंत्रज्ञानाच्या पाच प्रमुख शाखांमध्ये जास्तीत जास्त व्हर्च्युअल लॅब उपलब्ध करून देण्याचे मंडळाने सुचविले आहे. त्यानुसार मडळस्तरावर तज्ज्ञ समितीमार्फत काम सुरू असल्याचे डॉ. चितलांगे यांनी स्पष्ट केले आहे.

प्रयोगशाळेत ‘प्रात्यक्षिके’ बंधनकारक…
व्हर्च्युअल लॅब या संस्थेतील प्रयोगशाळेस पर्याय म्हणून वापरण्यात येणार नाहीत. व्हर्च्युअल लॅबचा उपयोग विद्यार्थ्यांना अधिकचे ज्ञान घेण्यासाठी अतिरिक्त सुविधा म्हणून करण्यात यावा. विद्यार्थ्यांनी संस्थेच्या प्रयोगशाळेत प्रत्यक्षरीत्या प्रात्यक्षिके करणे बंधनकारक राहील. पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील मुख्य पाच शाखांकरिता उपलब्ध असलेल्या शाखानिहाय व्हर्च्युअल लॅबची यादी मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, प्राचार्यांनी संबंधित अधिव्याख्यात्याच्या व विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून द्यावे, असे देखील चितलांगे यांनी स्पष्ट केले आहे.

Back to top button