कसबा पेठ विधानसभा निवडणुक : विरोधक एकवटल्यास भाजपला बालेकिल्ल्यातच आव्हान | पुढारी

कसबा पेठ विधानसभा निवडणुक : विरोधक एकवटल्यास भाजपला बालेकिल्ल्यातच आव्हान

ज्ञानेश्वर बिजले

पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला असला, तरी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व विरोधक एकवटल्यास येत्या पोटनिवडणुकीत भाजपला धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मतदारसंघात बहुजन समाज मोठ्या संख्येने असल्याने तो निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. मतदारसंघाची 2009 मध्ये फेररचना झाल्यानंतर कसबा पेठ मतदारसंघ विस्तारला. नव्याने झालेल्या या मतदारसंघात मुख्यत्वे जुन्या पुण्यातील पेठांचा समावेश आहे. ब्राह्मण आणि मराठा समाजाचे वर्चस्व या मतदारसंघात आहे. या दोन्ही समाजाच्या मतदारांची संख्या प्रत्येकी पन्नास हजारांच्या आसपास असली, तरी बारा बलुतेदारांची, व्यापारीवर्गाची आणि मुस्लिम व दलित समाजाच्या मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. मतदारांची एकूण संख्या पावणेतीन लाख आहे.

कसबा पेठ मतदारसंघ 2009 पूर्वी आकाराने लहान आणि कमी मतदारसंख्येचा होता. फेररचना होताना, लगतच्या भवानी पेठ, पर्वती आणि शिवाजीनगर मतदारसंघाचा भाग समाविष्ट झाल्याने, या मतदारसंघातील बहुजन समाजाच्या मतदारांची संख्या वाढली. भाजपचे या समाजातील कार्यकर्तेही येथे मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे, महापालिका निवडणुकीत अठरापैकी तेरा नगरसेवक भाजपचे आहेत.

मतदारसंघाच्या पश्चिमेकडील सदाशिव, शनिवार, नारायण, नवी पेठ या पेठांमध्ये भाजपचे वर्चस्व आहे. दुसर्‍या बाजूला पूर्वेकडील नाना, भवानी, गणेश, मंगळवार, रविवार या पेठांच्या भागांत महाविकास आघाडीतील पक्षांची चांगली ताकद आहे. याच भागातून काँग्रेस व राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन व शिवसेनेचा एक नगरसेवक निवडून आला आहे. या मतदारसंघात महापालिकेचे चार सदस्यांचे जुने तीन प्रभाग पूर्ण, तर तीन प्रभागाचे काही भाग समाविष्ट आहेत.

पूर्वेकडील भाग मतदारसंघात समाविष्ट झाल्यानंतर, बहुजन मतदारांची संख्या वाढली. तांबट, कुंभार, भोई, लोणारी, गवळी, शिंपी, काशीकापडी, परदेशी या समाजाची वस्ती या भागात आहे. तेलुगू भाषिक, पद्मसाळी समाज या भागात आहे. रविवार पेठ, नाना पेठ, टिंबरमार्केट या परिसरात व्यापारीवर्गाचे वास्तव्य आहे. मोमीनपुरा, कागदीपुरा भागात मुस्लिम समाजाच्या, तर लोहियानगरच्या वस्ती भागात दलित समाजाच्या मतदारांची संख्या लक्षणीय आहे.

विरोधकांनाही लक्षणीय मते
भाजपचे उमेदवार सातत्याने मतदारसंघ जिंकत असले, तरी गेल्या तीन निवडणुकांमध्ये विरोधी पक्षाच्या उमेदवारांनीही लक्षणीय मते मिळविल्याचे दिसून येते. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्रितपणे प्रचाराला लागल्यास येथील लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे. यंदा प्रथमच काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना एकत्रितरीत्या लढणार असल्याने, निवडणुकीचा अंदाज बांधणे अवघड ठरणार आहे.

गेल्या तीन निवडणुकांतील मतदान
वर्ष                          उमेदवार                         मिळालेली मते
2009            आ. गिरीश बापट (भाजप)                 54982
रवींद्र धंगेकर (मनसे)                       46820
रोहीत टिळक (काँग्रेस)                        46728

2014          आमदार गिरीश बापट (भाजप)            73594
रोहीत टिळक (काँग्रेस)                       31322
रवींद्र धंगेकर (मनसे)                           25998
दीपक मानकर (राष्ट्रवादी)                  15865
सूर्यकांत आंदेकर (अपक्ष)                  10001
प्रशांत बधे (शिवसेना)                         9203

2019       आमदार मुक्ता टिळक (भाजप)            75492
अरविंद शिंदे (काँग्रेस)                      47296
विशाल धनवडे (अपक्ष)                    13989
अजय शिंदे (मनसे)                       8284

Back to top button