हिंदूचा जन आक्रोश…हजारोंच्या संख्येने हिंदू बांधव मोर्चात सहभागी | पुढारी

हिंदूचा जन आक्रोश...हजारोंच्या संख्येने हिंदू बांधव मोर्चात सहभागी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : भगवे झेंडे…भगवी वस्त्रे….भगव्या टोप्या परिधान करून रविवारी सकाळी हजारोंच्या संख्येने हिंदू बांधव जन आक्रोश मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी मोर्चेकर्‍यांनी ‘लव्ह जिहाद मुक्त पुणे झालेच पाहिजे,’ ‘गोहत्या बंदी झालीच पाहिजे,’ ‘धर्मांतर बंदी झालीच पाहिजे,’ ‘बेटी बचाव भारत बचाव,’ ‘जय श्रीराम’ अशी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच मोर्चादरम्यान जोरदार शंखनादाचा आवाज देखील घुमत होता.

सकाळी सव्वा अकराच्या सुमारास लाल महाल येथील मोरच्याला सुरुवात झाली. मोर्चाच्या सोबतीला ‘धर्मवीर रथ’ होता. अवघ्या पाचच मिनिटात हा रथ श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराजवळ पोहचला. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात छत्रपती शिवेंद्रराजे यांच्या हस्ते आरती करण्यात आली.

आरती झाल्यावर रथ पुढे मार्गस्थ झाला. साडे अकराच्या सुमारास मोर्चा बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्त्याला लागला. मोर्चादरम्यान तरुणाईसह महिलांचाही मोठा सहभाग होता. यावेळी करण्यात आलेल्या जोरदार घोषणाबाजीमुळे लक्ष्मी रस्ता दणाणून सोडला. मोर्चेकर्‍यांची रस्त्यावर तर बघ्यांची रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी झाली होती. संपूर्ण लक्ष्मी रस्ता भगवामय झाला होता. यावेळी पोलिसांचा ठिकठिकाणी मोठा बंदोबस्त पाहायला मिळाला तसेच मोर्चा सोबत देखील पोलिसांची पथके चालत होती.

Back to top button