पारगाव : जनावरांबाबत मेंढपाळ, शेतकरी बेफिकीर; बिबट्यांचे हल्ले ठरताहेत जीवघेणे | पुढारी

पारगाव : जनावरांबाबत मेंढपाळ, शेतकरी बेफिकीर; बिबट्यांचे हल्ले ठरताहेत जीवघेणे

पारगाव(ता .आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : बिबटप्रवण क्षेत्र असलेल्या आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात बिबट्यांचे हल्ले नित्याचे असताना मेंढपाळ, गोपालक शेतकर्‍यांकडून पाळीव जनावरे अक्षरश: उघड्यावर बांधली जात आहेत. पाळीव जनावरांसाठी सुसज्ज गोठे, शेड नसल्याने हल्ले वाढतच चालले आहेत, ही बेफिकिरी धोकादायक ठरत आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात पारगाव, शिंगवे, काठापूर, नागापूर, वळती, रांजणी, थोरांदळे आदी गावांमध्ये बिबट्यांचा वावर कायम आहे.

या गावांमध्ये शेतकरी, मेंढपाळ, गोपालकांच्या पाळीव प्राण्यांवर बिबट्यांचे हल्ले नित्याचेच आहे. घरात पशुधन मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु, पशुधनाची काळजी मात्र घेतली जात नाही. पाळीव जनावरे बिनधास्तपणे उघड्यावरच बांधलेली दिसत आहेत. पाळीव कुत्री , शेळ्या, मेंढ्या, गाई, घोडे ही जनावरे बाहेरच बांधली जातात. या परिसरात धनगर, स्थानिक मेंढपाळांच्या शेळ्या, मेंढ्यांवर बिबट्यांचे कायम हल्ले होतात. परंतु, तरीदेखील धनगर, स्थानिक मेंढपाळांचे शेळ्या, मेंढ्यांचे वाडे हे अडचणीच्याच ठिकाणी मुक्कामाला असतात.

या परिसरात उसाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. बिबट्यांना लपण जागा आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ऊसतोडीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने बिबट्यांचा अधिवास संपला आहे. त्यामुळे जनावरांवर हल्ले पुन्हा होत आहेत. अनेक शेतकर्‍यांच्या गाई, कालवडी या घराच्या भिंतीलगत बांधल्या जातात. विजेची सोय केली जात नसल्याने तेथे हल्ले होतात.

हल्ल्यानंतर वन विभागाच्या वतीने पंचनामा केला जातो. तर संबंधित पशुधन मालकाला नुकसानभरपाईदेखील मिळते. परंतु, एकाच पशुधन मालकाच्या जनावरांवर हल्ल्याच्या वारंवार घटना घडूनही मालकांकडून पाळीव जनावरांसाठी सुसज्ज निवार्‍याची सोय केली जात नाही. वास्तविक पाहता पाळीव जनावरांसाठी भक्कम निवार्‍याची सोय करणे आवश्यकच आहे.

मेंढपाळ, गोपालक शेतकर्‍यांनी आपापल्या पाळीव जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे. जनावरांसाठी भक्कम निवारा करणे आवश्यक आहे. जनावरांच्या शेड, गोठे, वाड्यांभोवती लख्ख प्रकाशाची सोय केली, तर बिबट्यांचे हल्ले निश्चित टाळता येतील.

               -प्रदीप कासारे, वन परिमंडळ अधिकारी – वळती वन विभाग

 

Back to top button