

संतोष शिंदे :
पिंपरी : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध शस्त्र बाळगणार्या गुन्हेगारांविरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये कोयता किंवा तत्सम हत्यार पकडणार्या पोलिसांना एक, तर पिस्तूल पकडणार्या पोलिसांना दहा गुण देण्यात येणार आहेत. गुरुवारी (दि. 19) सुरू करण्यात आलेली ही मोहीम सलग दहा दिवस सुरू राहणार आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मागील काही दिवसांपासून शहरांमध्ये गुन्हेगारी वाढल्याची ओरड केली जात आहे. दरम्यानच्या काळात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंतर्गत येणार्या मावळ तालुक्यात कोयता गँगने धुडगूस घातला. त्यामुळे परिसरातील सामाजिक स्वास्थ्य बिघडल्याचा आरोप झाला. मावळ तालुक्यातील संबंधित गँगच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. मात्र, तरीही त्यांची पिलावळ अजूनही मोकाटच आहे. यातच चिंचवड विधानसभेत निवडणुकांचे बिगुल वाजल्याने पोलिस अलर्ट झाले आहेत. निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी घातक शस्त्र बाळगणार्या गुन्हेगारांची उचलबांगडी करण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे.
पंधरा वर्षांचे काढले रेकॉर्ड
या मोहिमेसाठी पोलिसांनी मागील पंधरा वर्षात शस्त्र बाळगल्याप्रकरणी कारवाई केलेल्या गुन्हेगारांची माहिती संकलित केली आहे. या रेकॉर्डनुसार गुन्हेगारांची झाडाझडती घेण्याचे काम सुरू आहे.
खबर्यांचे जाळे तयार करा; रॅकेटच्या मुळाशी जा
तलवार, कोयता, पालघन, पिस्तूल वापरुन गुन्हे करणार्या गुन्हेगारांनी शास्त्र कोठून कसे आणली. तसेच, शस्त्र कोणासाठी व कशासाठी आणले, या बाबतची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले आहेत. तसेच, शहरात अवैध शस्त्र मिळू नये, यासाठी खबर्यांचे जाळे तयार करून, घराघरांमध्ये संपर्क तयार करावा. तरूण मुले, कामगार, विविध संघटना यांच्याकडून माहिती घ्यावी. हद्दीत पिस्तूलाचा वापर होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे चौबे यांनी दिलेल्या आदेशात नमूद आहे.
गुणांकन पद्धतीने होणार मूल्यमापन
दहा दिवसाच्या विशेष मोहिमेअंतर्गत केलेल्या कारवाईचे मुल्यमापन गुणांकन पद्धतीने करण्यात येणार आहे. कोयता पालघन तलवार किंवा तत्सम शस्त्र जप्त केल्यास एक गुण दिला जाणार आहे. तसेच, लोखंडी पिस्तूल किंवा तत्सम शस्त्र जप्त केल्यास दहा गुण दिले जाणार आहे.
उच्चपदस्थ अधिकार्यांचे लक्ष
पोलिस ठाणे/शाखा यांच्याकडून केल्या जाणार्या शस्त्र विरोधी कारवाईकडे आयुक्तालयातील उच्चपदस्थ अधिकार्यांचे लक्ष आहे. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त मनोज लोहिया,अपर पोलिस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे यांना नियंत्रण कक्षाकडून दररोज अहवाल पाठवला जात आहे.