अंधत्वावर मात करीत कुटुंबाला आधार, राज्यसेवा परीक्षेत यश; खोरच्या रामदास लवांडेंची अफलातून जिद्द | पुढारी

अंधत्वावर मात करीत कुटुंबाला आधार, राज्यसेवा परीक्षेत यश; खोरच्या रामदास लवांडेंची अफलातून जिद्द

रामदास डोंबे

खोर : वयाच्या दुसर्‍या वर्षी आलेले अंधत्व… घरची परिस्थिती हलाखीची… आर्थिक संकटाने शिक्षण घेण्यास झालेली अडचण….अनेकदा स्पर्धा परीक्षेत आलेले अपयश, या सर्व गोष्टींवर मात करीत आज खोर (ता. दौंड) येथील रामदास शंकर लवांडे आपल्या जिद्दीच्या जोरावर उभा आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होत आता ते कर सहायक या पदाची परीक्षा पास झाले आहेत. अंधत्वावर मात करीत ते आपल्या कुटुंबाचा देखील सांभाळ चांगल्या प्रकारे करीत आहेत.

वयाच्या दुसर्‍याच वर्षी अंधत्व आल्याने रामदास यांच्या पुढील सर्वच वाटा खुंटल्या. आई-वडील आणि तीन भाऊ, असा रामदास त्यांचा परिवार आहे. घरची परिस्थिती ही जेमतेम. त्यामुळे प्रगतीच्या सर्वच वाटा खुंटलेल्याच. परंतु, लवांडे कुटुंबीयांनी त्यावरही मात करीत रामदास यांना भोसरीतील अंधशाळेत प्रशिक्षण दिले. बी. ए. राज्यशास्त्राची पदवीही त्यांनी मिळवली. त्यांनी चाकण येथील एका कंपनीत काम केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा निश्चय केला. परंतु, प्रश्न होता तो म्हणजे अभ्यास कसा करायचा? त्यावरही भाऊ आणी मित्र सोमनाथ बिचकुले यांच्या मदतीने त्यावर मात केली. दोघांना पुस्तकांचे वाचन करावयास लावायचे आणी त्याचे रेकॉर्डिंग करून ते पुन:पुन्हा ऐकायाचे, अशा प्रकारे अभ्यास केला.

सन 2012 मध्ये पहिल्यांदा रामदास यांनी लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. त्यामध्ये यश मिळाले नाही. अपयशाने खचून न जाता त्यांनी पुन्हा परीक्षा देण्याचा निश्चय केला. सलग 11 वेळा पूर्व व मुख्य परीक्षा दिल्यानंतर अखेर सन 2018 मध्ये झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत खर्‍या अर्थाने कार्याची पावती मिळाली आणी दिव्यांग असलेल्या रामदास लवांडे यांच्या जिद्दीला यश मिळाले आणि वयाच्या 35 व्या वर्षी रामदास लवांडे यांची मंत्रालयातील लिपिक पदावर निवड झाली. लवांडे हे एवढ्यावरच थांबले नाहीत, तर सन 2019 मध्ये झालेल्या राज्य सेवेच्या परीक्षेला पुन्हा उतरले आणि कर सहायकपदाची परीक्षा पास झाले. लवकरच या पदाचा कार्यभार मिळणार असल्याचे दिव्यांग रामदास लवांडे यांनी सांगितले.

Back to top button