उपप्राचार्य, शिपायाविरुध्द गुन्हा दाखल; आळे ज्ञानमंदीर शाळा मारहाण प्रकरण | पुढारी

उपप्राचार्य, शिपायाविरुध्द गुन्हा दाखल; आळे ज्ञानमंदीर शाळा मारहाण प्रकरण

आळेफाटा(ता.जुन्नर); पुढारी वृत्तसेवा : आळे  येथील ज्ञानमंदिर हायस्कूल आणि कॉलेजच्या आवारात अल्पवयीन विद्यार्थ्यांला शिक्षक आणि सहकारी शिपायाकडुन अमानुषपणे मारहाण प्रकरणी आळेफाटा पोलीसानी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत उपप्राचार्य आणि शिपाया विरोधात शनिवारी (21 जानेवारी) रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. उपप्राचार्य जयसिंग जाधव व शिपाई सोमनाथ कुऱ्हाडे असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिकची माहिती अशी की, ज्ञानमंदिर हायस्कूल आणि कॉलेजच्या आवारात शिक्षकांकडे पाहून शेरोशायरी केल्याच्या गैरसमजातून शिक्षक आणि शिपायाने 17 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थी शिवीगाळ करून हाताने लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार 20 जानेवारी रोजी घडला होता. याच वेळी एका विद्यार्थ्यांने त्यांच्या मोबाईलवर घटनेचे चित्रिकरण केले. ही क्लिप सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर शिक्षकांच्या विरोधात रोष निर्माण झाला आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पालकांनी शनिवारी विद्यालयात येत शिक्षक आणि शिपायला निलंबित करण्याची मागणी केली. ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष भाऊशेठ कुऱ्हाडे यांनी संबंधितावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र पीडित मुलाच्या नातेवाईकांनी सबंधिताविरोधात तक्रार देण्यास असमर्थता दर्शवल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेता. पोलीस जवान अमित मालुंजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादवी कलम 323, 504, 34, सह बाल न्याय अधिनियम काळजी व संरक्षण 2015 चे कलम
75, बाल न्याय अधिनियम मुलांची काळजी व संरक्षण 2000 चे कलम 23 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल पवार करत आहे.

Back to top button