पुणे : प्रजासत्ताकदिनापर्यंत गोवर-रुबेला लसीकरण पूर्ण करणार | पुढारी

पुणे : प्रजासत्ताकदिनापर्यंत गोवर-रुबेला लसीकरण पूर्ण करणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात नवीन वर्षात गोवरचा उद्रेक कमी झाला असला, तरी गोवर रुबेला लसीकरणासाठी युध्द पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. प्रजासत्ताक दिनापर्यंत राज्यातील सर्व वंचित बालकांना एमआर लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्याचे आरोग्य विभागाने ठरवले आहे. एकही बालक लसीकरणासाठी वंचित राहू नयेत, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यात विशेष पथकांमार्फत गोवर रुबेला लसीकरणापासून वंचित राहिलेल्या बालकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यासाठी 1572 पथके कार्यरत आहेत.

आतापर्यंत 1 कोटी 54 लाख 68 हजार 229 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. उद्रेकग्रस्त भागात अतिरिक्त डोस देण्यासाठी 4 लाख 91 हजार बालकांपर्यंत पथकांना पोहोचण्यात यश आले. 3 लाख 51 हजार 233 बालकांना अतिरिक्त डोस देण्यात आला आहे. राज्यामध्ये गोवर रुबेला लसीकरणाच्या विशेष मोहिमेचा दुसरा टप्पा 15 जानेवारीपासून सुरु झाला आहे. 20 जानेवारीपर्यंत 4155 अतिरिक्त लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये 62 हजार 940 बालकांना पहिला, तर 61 हजार 527 बालकांना दुसरा डोस देण्यात आला. राज्यात 1 लाख 62 हजार 253 बालकांना व्हिटॅमिन एची मात्रा देण्यात आली.

Back to top button