हडपसरला हॅण्डबॉल स्टेडियमला ठोकले ‘सील’; महापालिका प्रशासनाची कार्यवाही | पुढारी

हडपसरला हॅण्डबॉल स्टेडियमला ठोकले ‘सील’; महापालिका प्रशासनाची कार्यवाही

हडपसर; पुढारी वृत्तसेवा : हडपसर परिसरातील डीपी रोडवरील महापालिकेचे हॅण्डबॉल स्टेडियम आहे. ते महापालिकेच्या क्रीडा अधिकार्‍यांनी सीलबंद केल्याने या भागातील क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. या स्टेडियमवर खेळाडूंना गेल्या सोळा वर्षांपासून विनामूल्य बॅडमिंटन व हॅण्डबॉल या खेळांचे प्रशिक्षण दिले जात होते. मात्र, ते बंद करून महापालिकेने परिसरातील खेळाडूंवर एक प्रकारे अन्याय केल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

हडपसर भागात मुलांसाठी खेळाचे मैदान नाही. यामुळे स्थायी समिती माजी अध्यक्ष दिलीप तुपे यांच्या प्रयत्नातून डीपी रोड येथे महापालिकेचे हॅण्डबॉल स्टेडियम उभारण्यात आले. या स्टेडियमवर परिसरातील मुला, मुलींना बॅडमिंटन व हॅण्डबॉल खेळांचे प्रशिक्षण दिले जात. मात्र, महापालिकेच्या क्रीडाविभागाने हे स्टेडियम सील करून काय साध्य केले, असा प्रश्न आता क्रीडाप्रेमींकडून उपस्थित केला आहे.

हॅण्डबॉल खेळाचे प्रशिक्षक विजय फरगडे म्हणाले, ‘महापालिकेने खेळाडूंना प्रोत्साहान देण्याऐवजी हे स्टेडियम अचानक बंद करून त्यांना खेळापासून वंचित ठेवण्याचा प्रकार केला आहे. क्रीडाविभागाच्या या कारवाईबाबत खेळाडूंकडून नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाने हे स्टेडियम लवकर पूर्ववत न केल्यास हॅण्डबॉल संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.’ माजी नगरसेवक मारुती तुपे व उल्हास तुपे म्हणाले की, हॅण्डबॉल स्टेडियमबाबतचे निवेदन लवकरच महापालिका प्रशासनाला दिली जाईल. ते पुन्हा सुरू करून खेळाडूंना न्याय मिळवून दिला जाईल.

महापालिकेने हे स्टेडियम बंद करून काय साध्य केले, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. क्रीडाविभागाने खेळाडूंना संधी उपलब्ध करून देण्याऐवजी त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला आहे. हे स्टेडियम पुन्हा सुरू न केल्यास आंदोलन करून खेळाडूंना न्याय मिळवून दिला जाईल.

                                  – दिलीप तुपे, माजी अध्यक्ष, स्थायी समिती, महापालिका.

हडपसर परिसरातील डीपी रोड येथील हॅडबॉल स्टेडियम ही महापालिकेची वास्तू आहे. या ठिकाणी ज्यांना कुणाला हॅडबॉल स्टेडियम भाडेतत्वावर पाहिजे असेल, त्यांनी नियमाने महापालिकेकडे पत्राद्वारे मागणी करावी. या स्टेडियमचा अनधिकृतपणे वापर होऊ नये, म्हणून ते सीलबंद केले आहे.

                                                    – मीनाक्षी ठाकूर,
                                     प्रभारी क्रीडा अधिकारी, महापालिका.

Back to top button