पुणे : कुस्तीचा आखाडा हाच मल्लाचा धर्म; विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे प्रतिपादन | पुढारी

पुणे : कुस्तीचा आखाडा हाच मल्लाचा धर्म; विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे प्रतिपादन

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ‘65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख यांच्या लढतीनंतर ज्यांनी कधी कुस्ती खेळली नाही, लंगोटही लावला नाही त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले विचार मांडले आहेत. ज्यांना त्या खेळातील कळते त्यांनी बोलले तर उचित राहील; परंतु कुस्तीच्या माध्यमातून धर्माचे राजकारण सध्या देशात केले जात आहे. मल्लाचा फक्त कुस्तीचा आखाडा हाच धर्म असतो,’ असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराच्या वतीने ‘हिंद केसरी’ अभिजित कटके, ‘महाराष्ट्र केसरी’ शिवराज राक्षे, ‘उपमहाराष्ट्र केसरी’ महेंद्र गायकवाड यांच्या सन्मानप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी कटके आणि राक्षे या दोघांना एक बुलेट, एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. या वेळी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार सुनील टिंगरे, अशोक पवार, दिलीप मोहिते, चेतन तुपे आदी मान्यवर उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेनंतर देशात सिंकदर शेखच्या लढतीवरून राजकारण करण्यात आले. सिंकदर हासुद्धा उत्कृष्ट पैलवान असून, त्यानेही चांगलाच खेळ केला आहे; परंतु, स्पर्धा म्हटली की यश-अपयश येतच असते; परंतु त्याला जातीय रंग देणे हे अयोग्य आहे. खेळात कधीही जात-धर्म पाळला जात नसतो आणि त्यावरून बदनामी करून राजकारण करणे चुकीचे आहे.’

’छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीला राजमान्यता मिळवून दिली. त्यानंतर स्व. खाशाबा जाधव यांनी कुस्तीत पहिले पदक देशाला मिळवून दिले. त्यांचा वारसा आपणच जपणे गरजेचे आहे. आगामी काळात होणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील मल्लांनी जास्तीत जास्त पदकांची लयलूट करीत देशाचे नाव मोठे करावे.

खेळाडूंना कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच सहकार्य करेल. खेळ आणि खेळाडूंच्या सोयी-सुविधांमध्ये सत्ताधारी अथवा विरोधी पक्ष कोणतेही राजकारण करणार नाही,’ अशी ग्वाही पवार यांनी या वेळी दिली. यावेळी अभिजित कटके, शिवराज राक्षे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत जगताप यांनी केले.

Back to top button