दूध उत्पादक आर्थिक संकटात; वातावरणात बदल, महागाई, पशुखाद्याच्या किमती वाढल्याने पशुपालक चिंतेत | पुढारी

दूध उत्पादक आर्थिक संकटात; वातावरणात बदल, महागाई, पशुखाद्याच्या किमती वाढल्याने पशुपालक चिंतेत

लोणी-धामणी(ता .आंबेगाव) : पुढारी वृत्तसेवा आधुनिक शेती व पशुपालन हा व्यवसाय आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात चांगल्या जोमाने सुरू आहे. वातावरणात बदल, महागाईचे चटके शेतकर्‍यांना संकटात टाकत आहेत. पशुखाद्याच्या किमती वाढल्याने पशुपालक मोठ्या अडचणीत सापडला आहे. दूधपुरवठा करून भाव वाढवू शकत नसल्याने दूध उत्पादक शेतकर्‍यांची तारेवरची कसरत झाली आहे. जनावरांना दिल्या जाणार्‍या पूरक खाद्याचा भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे पशुपालक चिंतेत आहेत. याउलट दुधाचा भाव वाढत नाही. मात्र, पशुखाद्याचे दर वाढत चालल्याने पशुपालन करावे की नाही, असा प्रश्न पशुपालक आणि शेतकर्‍यांना
भेडसावत आहे.

शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेतकरी पशुपालन करतात. अनेक जण दुग्धव्यवसायास पसंती देतात. शेतकर्‍यांना आर्थिक सक्षम होण्यास दुग्धव्यवसाय कष्टाचा असला तरी फायदेशीर आहे. या व्यवसायातून आर्थिक भर पडण्यास मदत होते. तथापि, दुधाळ जनावरांना व्यवस्थापन करताना खाण्यावर विशेष लक्ष द्यावे लागत आहे.

दूध देणाऱ्या जनावरांना समतोल व पूरक खाद्य द्यावे लागते. त्यातच काही महिन्यांपासून पशुखाद्याच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. सरकी पेंड 1 हजार 200 वरून 1 हजार 700 रुपयांवर गेली आहे. सुग्रास 1 हजार 50 वरून 1 हजार 250 ते 1 हजार 400 रुपयांवर गेला आहे. गव्हाचा भुसा 1 हजार 200 वरून 1 हजार 550 रुपयांवर पोहचला आहे. एकीकडे पशुखाद्याचे दर वाढत असताना दुसरीकडे दुधाचा भाव वाढत नाही. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

पशुखाद्य महाग झाल्याने दूध व्यवसाय करणे चिंतामय झाले आहे. खाद्य महागले; पण दुधाचे दर वाढले नसल्याने शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शिवाय, आर्थिक ताळमेळ घालणे कठीण झाले आहे.

                                                                      संभाजी आदक,
                                                     दूध उत्पादक शेतकरी, मांदळेवाडी

पशुखाद्य तयार करण्यासाठीच्या कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढल्याने पशुखाद्य वाहतूकही महागली आहे. त्यामुळे कंपन्यांनी खाद्याच्या पोत्यांची दरवाढ केली आहे. त्यामुळे आम्हाला दरवाढ करावी लागली.

                                                                विजय आदक,
                                       दुग्धव्यावसायिक व पशुखाद्य विक्रेता, मांदळेवाडी

 

 

 

Back to top button