पुणे : दगदगीतही जपली ‘वाईल्ड लाईफ’ फोटोग्राफी; भोर यांची 50 पेक्षा अधिक अभयारण्यांत भ्रमंती | पुढारी

पुणे : दगदगीतही जपली ‘वाईल्ड लाईफ’ फोटोग्राफी; भोर यांची 50 पेक्षा अधिक अभयारण्यांत भ्रमंती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नेहमीच्याच दगदगीच्या कामातून वेळ काढून पुण्यातील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गेल्या 20 वर्षांपासून ‘वाईल्ड लाईफ फोटोग्राफी’चा छंद जोपासत आहेत. त्यांनी या छंदासाठी राज्य, देशासह परदेशांतील मिळून 50 पेक्षा अधिक अभयारण्यात भ्रमंती केली आणि विविध पक्षी-प्राणी यांचे फोटो आपल्या कॅमेर्‍यात टिपले. सध्या भोर यांनी काढलेले फोटो वाईल्ड लाईफ फोटोग्राफीच्या क्षेत्रात खूपच चर्चेत असतात.

1998-99 साली भोर यांनी आपला हा छंद जोपासायला सुरुवात केली. त्या वेळी ते उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नव्हते. तेव्हापासून त्यांनी आपला छंद जोपासायला सुरुवात केली. त्यानंतर ते 2002 साली नाशिक येथे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून परिवहन विभागात रूजू झाले. त्यानंतर 2015 साली भोर पदोन्नतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी झाले. लातूर आणि आता पुण्यात ते उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून काम करीत आहेत.

…यामुळे लागला छंद
मुंबईला एका कामानिमित्त गेले असता, भोर यांनी जहांगीर आर्ट गॅलरीत उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र प्रदर्शन पाहिले. त्या वेळी त्यांनासुध्दा अशीच फोटोग्राफी आपणदेखील करावी, असा विचार आला. मात्र, काही दिवसांनी या विचाराचे छंदात रूपांतर झाले अन् फोटोग्राफीच्या क्षेत्राला एक नवा ’वाईल्ड लाईफ’ फोटोग्राफर मिळाला. 1999 ते 2023 अशा 22 ते 23 वर्षे हा छंद जोपासला आहे आणि येथून पुढेदेखील वेळ मिळेल तसा हा छंद जोपासणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दै.‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

…या अभयारण्यात केली फोटोग्राफी
मध्य प्रदेशातील बांधवगड, कान्हा, महाराष्ट्रातील ताडोबा, राजस्थानातील रणथंबोर, राजस्थानातील पक्षी अभयारण्य किओलॅडिओ, कर्नाटकातील काबीनी, गुजरातमधील गीर, लिटल रन ऑफ कच्छ, उत्तराखंड येथील सत्ताल, पंगोट, लाव्हा, काझीरंगा, मेळघाट, पेंच, ताम्हिणी घाट, भिगवण, सलीम अली पक्षी अभयारण्य, अशा भारतातील अनेक अभयारण्यांमध्ये भोर यांनी वाईल्ड लाईफ फोटोग्राफी केली आहे. तर, भारताबाहेर केनियाचे मसाईमारा, साऊथ आफ्रिकेतील झांबीया, साऊथ अमेरिकेतील इक्वेडोर, साऊथ लुआंग्वा, यांसारख्या अनेक परदेशी अभयारण्यांमध्येसुद्धा भोर यांनी आपला फोटोग्राफीचा छंद जोपासला.

वाईल्ड लाईफ फोटोग्राफी
करण्याचा माझा छंद खूप जुना आहे. कार्यालयातील कामातून वेळ मिळाला की, मी या छंदासाठी वेळ देत असतो. या छंदामुळे माझी स्ट्रेस लेव्हल कमी होते आणि कामातील एकाग्रता वाढते. काम करण्यास उत्साह येतो.

                                                                      – संजीव भोर,
                                                      उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

Back to top button