कारखान्यांनी इथेनॉलसह सीएनजी, हायड्रोजन उत्पादनाचा विचार करावा; शरद पवारांचा कारखानदारांना सल्ला | पुढारी

कारखान्यांनी इथेनॉलसह सीएनजी, हायड्रोजन उत्पादनाचा विचार करावा; शरद पवारांचा कारखानदारांना सल्ला

पुणे, पुढारी वृत्तसेवा: साखर कारखान्यांना आर्थिकदृष्टया सक्षम होण्यासाठी साखरेव्यतिरिक्त इथेनॉलसह अन्य उपपदार्थ निर्मितीवर भर द्यायला हवा अशी अपेक्षा शरद पवार व्यक्त केली. ते मांजरी येथे शनिवारी झालेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 46 व्या वार्षिक सर्वसाधारण (व्हीएसआय) सभेत बोलत होते. साखरेचे साठे कमी करण्यासाठी अतिरिक्त साखर ही इथेनॉल निर्मितीकडे वळविणे साखर उद्योगास फायदेशिर ठरलेले आहे. केंद्र सरकारने इंधनांमध्ये इथेनॉल मिश्रणाचे 10 टक्क्यांचे उद्दिष्ट साध्य झालेले आहे.

केंद्राने फ्लेक्स इंधन वाहनांच्या उत्पादनासाठी प्रोत्हसान दिलेले आहे. त्यामुळे इथेनॉलच्या मागणीमध्ये आणखी वाढ होण्याची अपेक्षा असून त्याची पुर्तता करणे ही आजची गरज आहे. इथेनॉल व्यतिरिक्त सीबीजी (क्रॅम्प्रेस्ड बायोगॅस) आणि हायड्रोजनसारखे अक्षय उर्जा देशाच्या उर्जेच्या गरजेमध्ये महत्वाची भुमिका बजावतील. हायड्रोजन हे पेट्रोल व डिझेलपेक्षा प्रभावी इंधन असून ते स्वच्छ आहे. जे ज्वलनानंतर पाणी तयार करते. त्यामुळे अशा पदार्थांच्या उत्पादनासाठी साखर कारखान्यांनी प्रयत्न करावेत.

शेतकर्‍यांनी उसाच्या उत्पादनवाढीसाठी शुध्द ऊस बियाणांचा वापर वाढवावा. व्हीएसआयच्या जालना येथील 127 एकरपैकी मराठवाड्यातील शेतकर्‍यांना 65 एकर क्षेत्रावरील उसाच्या बियाणांचा पुरवठा करण्यात आला आहे. नागपूर येथेही 76 एकर जागा घेण्यात आली असून तेथून नागपूर आणि अमरावती येथील शेतकर्‍यांसाठीही काम करण्यात येईल, असेही पवार यांनी सांगितले.

Back to top button