बावडा : मुक्त गोठा पद्धतीला दूध उत्पादकांची पसंती | पुढारी

बावडा : मुक्त गोठा पद्धतीला दूध उत्पादकांची पसंती

बावडा; पुढारी वृत्तसेवा : कोरोना प्रादुर्भावानंतर ग्रामीण भागात दूध धंदा चांगलाच वाढताना दिसत आहे. शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय वाढविताना दिसत असून, मुक्त गोठा पद्धतीला दूध उत्पादक शेतकर्‍यांची पसंती मिळत असल्याचे चित्र इंदापूर तालुक्यात पाहावयास मिळत आहे. मुक्त गोठ्यामुळे जनावरांचे आरोग्य सुदृढ राहते, गाई कमी आजारी पडतात त्यामुळे औषधांवर खर्चात बचत होते, दूध उत्पादन वाढते तसेच जनावरांच्या व्यवस्थापनावरील खर्च काही प्रमाणात कमी होतो, अशी माहिती महावीर गांधी, पोपट पांढरे (खोरोची) यांनी दिली. सध्या दुभत्या जनावरांना मागणी वाढल्याने किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दूध व्यवसाय अडचणीत सापडला होता. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांना गोठ्यातील जनावरांची संख्या कमी केली होती.

परिणामी, जनावरांच्या किमतीत मोठी घट झाली होती.दरम्यान, पशुखाद्याच्या दरात वाढ होत चालल्याने तसेच औषधे, हिरवा व वाळलेला चारा, मजुरांचा खर्च, विमा यामध्ये वाढ झाल्यामुळे दुधाचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे गाईच्या दुधाला प्रतिलिटरला किमान 40 रुपये एवढा दर मिळावा, अशी मागणीही महावीर गांधी व पोपट पांढरे यांनी केली आहे. दरम्यान, सध्या साखर कारखाने चालू असल्याने जनावरांना चार्‍याची कमतरता भासत नाही. मात्र, आगामी उन्हाळ्यात संभाव्य चाराटंचाई लक्षात घेता शेतकर्‍यांनी मकवानाची लागवड करावी, अशी आवाहन दूध उत्पादक शेतकरी गणेश घोगरे (बावडा), दीपक गुळवे (काटी), सचिन माने (कचरवाडी-बावडा) यांनी केले आहे.

Back to top button