पिंपरी : मांजात अडकलेल्या कबुतराचा वाचविला जीव | पुढारी

पिंपरी : मांजात अडकलेल्या कबुतराचा वाचविला जीव

नवी सांगवी : पिंपळे गुरव येथील सृष्टी चौकाकडून कल्पतरुच्या दिशेने जाताना कृष्ण मंदिराजवळ चिनी मांजामुळे पुन्हा एकदा झाडाच्या फांदीला अडकल्याने एक कबुतर जखमी झाल्याची घटना घडली. ही घटना गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली होती. यावेळी ही घटना परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास पडली असता बघ्याची भूमिका घेणार्‍यांची गर्दी जमली होती.  याप्रसंगी परिसरातून जात असताना सामाजिक कार्यकर्ते व पशुपक्षी प्रेमी अरविंद कदम, राष्ट्रवादी काँग्रेस चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष नितीन सोनवणे गर्दी पाहून थांबले. त्यांनी घटनास्थळी झाडावरील फांदीच्या मांजाला कबुतर अडकल्याचे दिसून आले. यावेळी मांजात पायाला फास लागल्यामुळे कबुतर उलटे लटकलेले होते. त्यामुळे कबुतर तरडफडत असल्याचे निदर्शनास आले.

अरविंद कदम, नितीन सोनवणे यांनी क्षणाचाही विलंब न करता झाडाला लागून असलेल्या इमारतीवरील गच्चीवर जाऊन स्वतःच्या जिवाची पर्वा न करता अलगदपणे मांजात लटकलेल्या त्या कबुतराला जीवदान दिले. यावेळी मांजात पाय अडकल्याने कबुतराने स्वतःचा जीव वाचविण्यासाठी तडफड करताना पायाला जखम झाल्याचे पहावयास मिळाले. यावर वेळीच उपचार व्हावे यासाठी सांगवीतील वन्य पशु पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे सचिव विनायक बडदे यांना संपर्क करून जखमी कबुतराला त्यांच्याकडे स्वाधीन केले.

सण उत्सव साजरे करताना इतरांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक असते. मात्र, अनेकांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, माणसांना अपघात होत आहेत, त्याचप्रमाणे पक्ष्यांनाही अपघातांना सामोरे जावे लागत आहे. यात काही पक्ष्यांच्या पाय, पंखांना दुखापत होत आहे. मकर संक्रांतीच्या काळात 15 पक्ष्यांना पतंगाच्या मांजामुळे दुखापत झाल्याच्या घटना घडून आल्याचे विनायक बडदे यांनी सांगितले.

Back to top button