धुके, दवबिंदूचा कांदा पिकाला फटका; वाल्हे परिसरातील कांदा उत्पादक हैराण | पुढारी

धुके, दवबिंदूचा कांदा पिकाला फटका; वाल्हे परिसरातील कांदा उत्पादक हैराण

वाल्हे(ता. पुरंदर); पुढारी वृत्तसेवा : पहाटेच्या वेळी दाट धुके व दवबिंदू पडत आहे. यामुळे लाल कांदा, उन्हाळी कांद्याच्या रोपांवर करपा व मर रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे. यामुळे महागड्या औषधांची फवारणी करून, शेतकरी पिके वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. यासह या धुक्यामुळे भाजीपाल्यावर कीडरोगांचा प्रादुर्भाव होण्याची तसेच लागवड केलेल्या कांद्याचे नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी धास्तावले आहेत.

नगदी पीक म्हणून वाल्हे परिसरामध्ये कांदालागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र, लागवड केलेल्या कांद्याला तसेच काढणीला आलेल्या कांद्याचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अवकाळी पावसाने होत्याचे नव्हते केल्याने शेतकर्‍यांना लाखो रुपयांचा फटका बसला होता.

यावेळी उंच व मुरमाड जमिनीत असलेला थोडाफार कांदा वाचला होता. मात्र, मागील काही दिवसांपासून रात्री धुके व पहाटे दवबिंदू, कधी कडाक्याचे ऊन, कधी ढगाळ वातावरणामुळे यामुळे पिकांवर करप्याचा प्रादुर्भाव होत आहे. सध्या कांद्याला मिळणारा बाजारभाव कमी प्रमाणात असून, सध्याच्या कांद्याच्या लागवडीचा खर्चदेखील वसूल होणे शक्य नसल्याचे कांदा उत्पादक शेतकरीवर्गाने सांगितले.

मात्र, सध्याच्या वातावरणातील बदलामुळे पुढील काही दिवसांत कांदा उत्पादन अल्प प्रमाणात होणार असल्याने भविष्यात तरी कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल, या आशेवर शेतकरी मिळेल तेथून महागडी कांदा रोपे आणून लागवड करताना दिसत आहे. मात्र, सध्या पडत असलेल्या धुके व दवबिंदूमुळे कांदापात पिवळी पडत आहे. लागवड केलेल्या कांद्यावरही या धुक्याचा परिणाम होत आहे.

Back to top button