पिंपरी : मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त ! | पुढारी

पिंपरी : मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त !

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाने अखेर पावले उचलली असून, नेहरूनर येथील अ‍ॅनिमेल शेल्टर येथे नसबंदी शस्त्रक्रिया युनिटचे नवीन केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यात एकूण 58 पिंजरे तयार करण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात मोकाट व भटक्या कुत्र्यांवर पिंपरी-चिंचवड महापालिका, कॅनाइन कंट्रोल अ‍ॅण्ड केअर आणि पीएफए यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या या नव्या युनिटमध्ये नवीन 58 पिंजरे तयार करण्यात आले आहेत. पूर्वीचे 72 पिंजरे होते. आता एकूण संख्या 130 इतकी झाली आहे. सध्या येथे दररोज 15 कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केला जातात.

या नवीन पिंजर्‍यांमुळे शस्त्रक्रियेची दररोजची संख्या 28 ते 30 होणार आहे. त्यानुसार एका वर्षात तब्बल 10 हजारांपेक्षा अधिक शस्त्रक्रिया केल्या जातील. त्यात मादी कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यास अधिक प्राधान्य दिले जात आहे. त्याचे प्रमाण 90 टक्के इतके आहे.

दररोज 50 नसबंदी शस्त्रक्रिया आवश्यक

पिंपरी-चिंचवड शहरातील भटक्या व मोकाट कुत्र्यांची संख्या अधिक आहे. कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी आणखी किमान 100 पिंजर्‍यांची गरज आहे. दररोज 50 कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने पालिका नियोजन करीत आहे, असे ढोले यांनी सांगितले.

 

पालिकेचा पशुवैद्यकीय विभाग येत्या 6 महिन्यांत या ठिकाणी आणखी 100 पिंजरे तयार करणार आहे. त्याबाबत कार्यवाही सुरू आहे. नेहरूनगर येथे एकात्मिक प्राणी नियोजन केंद्र तयार करण्यात येणार आहे. त्यात अद्ययावत श्वान उपचार केंद्र, श्वान निर्बीजीकरण केंद्र, लहान प्राणी दहन मशिन, मोठ्या प्राण्यांसाठी दहन मशिन, डॉग कॅचर वाहने, कॅटल (मोठी जनावरे) कॅचर वाहने, फिरते रुग्णालय उपलब्ध असणार आहे.

                                                                         – सचिन ढोले, उपायुक्त

 

 

Back to top button