पंढरपूर पोलिसांकडून आणखी एकाला अटक; दूधभेसळ प्रकरणात वडगावच्या मेहताकडील मशिन केले सील | पुढारी

पंढरपूर पोलिसांकडून आणखी एकाला अटक; दूधभेसळ प्रकरणात वडगावच्या मेहताकडील मशिन केले सील

बारामती; पुढारी वृत्तसेवा : पंढरपूर तालुक्यातील दूध भेसळ प्रकरणात वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील समीर सुभाष मेहता या मास्टरमाईंडचा हात असल्याचे पुढे आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांसह पोलिसांनी वडगावात छापा टाकला. या कारवाईत मेहताकडील एक मशिन सील करण्यात आली. तसेच त्याच्याकडे कामासाठी असलेल्या स्वप्निल राजेंद्र गायकवाड (रा. वडगाव निंबाळकर) याला पंढरपूर पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून, अद्याप मोठा तपास बाकी असल्याचे पंढरपूर ग्रामीणचे पोलिस उपनिरीक्षक दिलीप शिंदे यांनी सांगितले.

पंढरपूर पोलिस ठाण्यात या प्रकरणी निलेश बाळासाहेब भोईटे (वय 30, रा. रो हाऊस क्रमांक 38, वृंदावनम् सोसायटी, टाकळी), पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली येथील श्री स्वामी समर्थ दूध संकलन केंद्राचा मालक परमेश्वर सिध्देश्वर काळे ( वय 40) आणि वाहनचालक गणेश हनुमंत गाडेकर (वय 25, रा. गणेश नर्सरीजवळ, टाकळी रोड, पंढरपूर) तसेच वडगाव निंबाळकर येथील समीर सुभाष मेहता यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी (दि. 15) अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली होती. त्यात दुधामध्ये भेसळीसाठी वापरले जाणारे घातक द्रावण हे वडगावच्या समीर मेहता याच्याकडून नेले असल्याचे सांगण्यात आले होते.

त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांना सोबत घेत पंढरपूर पोलिसांनी वडगावात मेहता याच्या घरावर छापा टाकला. तेथे हे द्रावण बनविणारे मशिन जप्त केले गेले. तसेच त्याच्याकडील कामगार स्वप्निल गायकवाड याला ताब्यात घेत अटक करण्यात आली. गायकवाड याला न्यायालयाने 23 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मेहता याच्याकडून आणखी कुठे-कुठे हे घातक द्रावण भेसळीसाठी पुरवले जात होते, याची चौकशी गायकवाड याच्याकडे पोलिस करत आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून मेहता फरार झाला आहे. त्याचा लवकरच शोध लागेल. प्रकरणाची व्याप्ती मोठी असून, आणखी प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

रासायनिक द्रावणापासून दूध
फलटण पोलिसांनी गेल्या दहा वर्षांपूर्वी बारामती तालुक्यात चालणारे दूध भेसळीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त केले होते. त्या प्रकरणात मेहता याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्या वेळी बारामती तालुक्यातील अनेकांचे दूध भेसळ प्रकरणात नाव पुढे येते की काय, या धास्तीने धाबे दणाणले होते. मेहता याच्याकडील रासायनिक द्रावण पाण्यात टाकले की, दुधासारखाच घटक तयार होतो. हे दूध भेसळीचे आहे, हे ओळखणेसुद्धा कठीण होऊन बसते, अशी स्थिती आहे. आता पंढरपूर पोलिसांच्या कारवाईत मेहतावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्याकडील द्रावण पुणे, सातार्‍यासह सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नेले जात असल्याची चर्चा आहे. या द्रावणापासूनच दूध तयार करून ते संघांना पुरविले जाते. आरोग्यासाठी हे दूध अत्यंत अपायकारक आहे.

अनेकांचे धाबे दणाणले
मागील वेळी मेहता याच्यावर गुन्हा दाखल होऊन रॅकेट उघडकीस येताच बारामती आणि फलटण तालुक्यात मोठ्या प्रमाणात दूध संकलन घटले होते. हे संकलन का घटले, याच्या खोलात कोणी गेले नाही. याचाच अर्थ, रासायनिक द्रावणापासून मोठ्या प्रमाणावर दूध तयार करून ते विकले जात होते. आता पुन्हा या विषयाला वाचा फुटली आहे. त्यामुळे या भागासह फलटणमधील काही भेसळखोर डेअरीचालकांचे धाबे दणाणले आहे. कारवाईचा फास आपल्याभोवती आवळेल की काय, याची धास्ती त्यांना लागली आहे. दुसरीकडे लोकांच्या आरोग्याशी खेळणार्‍यांवर कडक कारवाईची मागणी होत आहे. विशेष म्हणजे बारामती तालुक्यातील भेसळीचे रॅकेट आजवर अन्य जिल्ह्यांतील पोलिस ठाण्यांनीच उघडकीस आणली आहेत.

Back to top button