ओतूरच्या ब्राह्मणवाडा चौकात प्रचंड धूळ, नागरिक हैराण; तोडगा काढण्याची गरज | पुढारी

ओतूरच्या ब्राह्मणवाडा चौकात प्रचंड धूळ, नागरिक हैराण; तोडगा काढण्याची गरज

ओतूर; पुढारी वृत्तसेवा : ओतूर येथील नगर व पुणे जिल्ह्याला जोडणार्‍या जिल्हामार्गावरील ब्राह्मणवाडा चौकातील रस्ता अत्यंत खड्डेमय झाला असून, परिसरात प्रचंड धुळीचे साम्राज्य आहे. ओतूरच्या ब्राह्मणवाडा चौक ते जुना डोमेवाडी रस्ता या मार्गावर खड्ड्यांमुळे दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढते आहे. या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण का रखडले आहे?

याबाबत नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आजूबाजूच्या परिसरातील व्यावसायिक व नागरिकांना मोठ्या प्रमाणात धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. ओतूर-ब्राह्मणवाडा रस्त्यावरील ओतूर गावच्या हद्दीतील नवीन एस. टी. स्थानक ते जुना डोमेवाडी रस्ता हा सुमारे एक किमी अंतराचा मार्ग अक्षरशः खड्डेमय बनला असून, रस्त्यावर खड्डे आहेत की खड्डयांमध्ये रस्ता? असा प्रश्न सामान्य नागरिक व वाहनचालकांना पडला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झालेली असून, कोणत्याही प्रकारची साधी डागडुजीदेखील करण्यात आलेली नाही. या मार्गावरून प्रवास करताना खड्डे चुकवताना अनेक दुचाकीचालकांचा अपघात होऊन ते जखमी झाले आहेत. धुळीमुळे या परिसरातील नागरिक, दुकानदार व व्यावसायिकांना श्वसनाचा त्रास होत असून, त्यांना गंभीर आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रोहोकडी ते जुना डोमेवाडी रस्ता या मार्गाचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र, ओतूर एस. टी. स्थानक ते जुना डोमेवाडी रस्ता या साधारण एक किमी मार्गाचे काम का रखडविण्यात आले आहे? असा प्रश्न सामान्य नागरिक, प्रवासी, वाहनचालक, शेतकरी, विद्यार्थी व ग्रामस्थ्यांकडून विचारला जात आहे. तसेच, तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

माझा किराणा व्यवसाय आहे. दुकानातील खाद्य, अन्नधान्य धूळ साचून खराब होत आहे. त्यामुळे माझे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. धुळीमुळे श्वास घ्यायला त्रास होतो, तर डोळ्यांचा, घशाचा त्रास होत आहे. या कारणाने कित्येक वेळा डॉक्टरकडे जाण्याची वेळ आली आहे.

               – सुनील चांदवडकर, माजी अध्यक्ष, किराणा व्यापारी असोसिएशन

Back to top button