

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा : सिंहगड परिसरातील खामगाव मावळ येथील अनेक महिन्यांपासून रखडलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिन्या उंदरांनी कुरतडल्याने नियमित पाणीपुरवठा सुरू होण्याआधीच अधिकारी, ठेकेदारावर धावाधाव करण्याची वेळ आली आहे. अडीच कोटी रुपये खर्च करून खामगाव मावळ, मोगरवाडी, चांदेवाडी, माळवाडी परिसरासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून ही पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे.
खडकवासला धरणावरून सुमारे आठ किलोमीटर अंतरावरून या योजनेसाठी पाणी उचलण्यात आले आहे. वीजपुरवठ्याअभावी या योजनेचे काम रखडले होते. याची दखल घेत आमदार भीमराव तापकीर यांनी अधिकार्यांची झाडाझडती घेतली. या योजनेंतर्गत असलेल्या गावांना जानेवारीपर्यंत पाणीपुरवठा सुरू करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या होत्या. त्यानंतर अधिकार्यांनी धावपळ करत डिसेंबरमध्ये या योजनेच्या पंपाला वीजपुरवठा सुरू केला.
त्यानंतर विद्युतपंप सुरू करून मोगरवाडी येथे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र, लोखंडी जलवाहिनी नसल्याने अनेक ठिकाणी प्लास्टिकच्या जलवाहिनी फुटल्याने दुरुस्ती करावी लागली. चांदेवाडी, माळवाडी भागातील अंतर्गत जलवाहिन्या उंदरांनी कुरतडल्याची बाब पाहणीत समोर आली आहे. प्रशांत अनिल भोसले म्हणाले, 'लोखंडी जलवाहिनी नसल्याने कमी दर्जाच्या प्लास्टिकच्या जलवाहिन्या उंदरांनी अनेक ठिकाणी पोखरल्या आहेत. तसेच मुख्य अंतर्गत जलवाहिनीतूनदेखील ठिकठिकाणी गळती सुरू आहे, त्यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. हलक्या प्लास्टिकच्या जलवाहिन्या जादा काळ टिकणार नाहीत, त्यामुळे लोखंडी जलवाहिनी टाकणे गरजेचे आहे.'
फुटलेल्या व उंदरांनी कुरतडलेल्या जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे. सध्या ठेकेदारामार्फत पाणीपुरवठा योजनेची चाचणी सुरू आहे. या योजनेचा विस्तार करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक निधी मंजूर झाल्यावर काम करण्यात येणार आहे.
-पांडुरंग गवळी,
उपविभागीय अभियंता, पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषदस्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच सिंहगड भागातील दुर्गम खामगाव मावळ मोगरवाडी व वाड्या-वस्त्यांत खडकवासला धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पाणीटंचाई दूर होणार आहे. पाणी योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
– नवनाथ पारगे,
माजी सदस्य, जिल्हा परिषद