वारज्यातील मिनी नाट्यगृह आगळेवेगळे; खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांचे मत | पुढारी

वारज्यातील मिनी नाट्यगृह आगळेवेगळे; खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांचे मत

वारजे; पुढारी वृत्तसेवा : वारजे सिप्ला सेंटर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलावाशेजारी महापालिकेच्या माध्यमातून कल्चरल सेंटर (मिनी नाट्यगृह) उभारले जात आहे. या कामाची पाहणी खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी नुकतीच पाहाणी केली.
माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांच्या प्रयत्नातून छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलावाशेजारी महापालिकेच्या माध्यमातून हा प्रकल्प उभारला जात आहे.

अ‍ॅड. चव्हाण म्हणाल्या, ‘वारजेकरांना सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी पुण्यामधील बालगंधर्व रंगमंदिर, भरत नाट्य मंदिर येथे जावे लागते. यामुळे वारजे माळवाडी भागामधील नागरिकांसाठी सांस्कृतिक नाट्यगृह उभे राहण्यासाठी दीपाली धुमाळ यांनी पुढाकार घेतला. मुंबईतील नावाजलेल्या पृथ्वी थिएटरप्रमाणे वारजेतील हे सेंटर उभारण्याचे काम सध्या सुरू असून, ते पुण्यातील आगळेवेगळे मिनी नाट्यगृह ठरणार आहे.’

शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष प्रदीप धुमाळ म्हणाले, ’या नाट्यगृहाची आसन क्षमता जवळपास 250 आहे. या कामासाठी अ‍ॅड. चव्हाण यांनी एक कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. नवोदित कलाकारांसह सांस्कृतिक क्षेत्रात काम करणार्‍या सर्वांना या नाट्यगृहाच्या माध्यमातून हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.’ राष्ट्रवादी काँग्रेसचे खडकवासला ग्रामीण अध्यक्ष त्रिंबक मोकाशी, अरुण पाटील आदी या वेळी उपस्थित होते.

Back to top button