पुणे : तरुणांचा आता व्हिडिओ पॉडकास्टकडेही कल! | पुढारी

पुणे : तरुणांचा आता व्हिडिओ पॉडकास्टकडेही कल!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : एखाद्या ठिकाणची भटकंती असो वा करिअरच्या वाटा….व्यसनमुक्तीचा प्रवास असो वा एखादा निराळा अनुभव…अशा विविध विषयांवर तरुणाई ऑडिओ स्वरूपातील पॉडकास्ट सादर करते हे आपण ऐकलेच असेल…पण, आता काही तरुण व्हिडिओ पॉडकास्टकडे वळले असून, आता पॉडकास्ट या माध्यमाला व्हिडिओचेही स्वरूप दिले जात आहे. यु-ट्यूब चॅनेलसह विविध मोबाईल अ‍ॅपवर असे व्हिडिओ पॉडकास्ट पाहायला मिळत आहेत आणि अनेक तरुणांनी हे नवीन माध्यम करिअर म्हणून निवडले आहे. ऑडिओ पॉडकास्टला चांगला प्रतिसाद आहेच. त्याचबरोबरीने आता व्हिडिओ पॉडकास्ट पाहणार्‍या तरुणांचीही संख्या वाढत असून, त्याद्वारे व्यसनमुक्तीपासून ते स्टार्टअप सुरू करणार्‍या तरुणांच्या मुलाखतीपर्यंतचा प्रवास दाखविला जात आहे.

स्वत:च्या आवाजात विविध विषय ऑडिओ रेकॉर्ड करून त्याला ऑडिओ पॉडकास्टचे स्वरूप देऊन ते विविध अ‍ॅपवर प्रसारित करण्याचा ट्रेंड सध्या सुरू आहे. सोशल मीडियावरील लेख किंवा ब्लॉगमध्ये शब्दांच्या माध्यमातून माहिती मांडली जाते. त्याचप्रकारे ऑडिओ पॉडकास्टमध्ये ऑडिओचा वापर करून माहिती पोचवली जाते. अनेक तरुण-तरुणी स्वत:च्या आवाजातील ऑडिओच्या माध्यमातून व्यक्त होत असून, त्यांच्या या ऑडिओ पॉडकास्टला चांगला प्रतिसादही आहे. त्या जोडीला आता व्हिडिओ स्वरूपातही पॉडकास्ट रेकॉर्ड करून ते यु-ट्यूबसह विविध अ‍ॅपवर अपलोड केले जात आहेत.

ऑडिओ पॉडकास्टमध्ये स्वत:च्या आवाजात एखादा विषय विशिष्ट शैलीत रेकॉर्ड करून, त्याला बॅकग्राऊंड संगीत देऊन, त्यात संवादाची भर घालत पॉडकास्ट ऑडिओ स्वरूपात अ‍ॅपवर अपलोड केले जाते. त्याचप्रमाणे संवाद, बॅकग्राऊंड संगीत अन् विशिष्ट शैलीतील सादरीकरण…अशा विविध गोष्टींचा वापर करून व्हिडिओ रेकॉर्ड केला जातो, त्यानंतर एडिटिंग करून त्याला पॉडकास्टचे रूप दिले जाते आणि ते अ‍ॅपवर अपलोड केले जाते. व्हिडिओ पॉडकास्टमुळे आता तरुणांना विविध गोष्टींची माहिती प्रत्यक्ष व्हिडिओ पाहून मिळत असून, व्हिडिओ पॉडकास्टलाही चांगले ’व्ह्युव्ज’ मिळत आहेत. करिअर, स्टार्टअप, कला-संस्कृती, क्रीडा, पर्यटन, पाककला, तरुणांच्या मुलाखती…अशा विविध विषयांवरील व्हिडिओ पॉडकास्ट सध्या पाहायला मिळत आहेत.

संगीतकार श्रेयस देशपांडे म्हणाले, ’ऑडिओ पॉडकास्ट करणार्‍या तरुणांची संख्या मोठी आहेच. पण, आता ऑडिओ स्वरूपात पॉडकास्टसह व्हिडिओ पॉडकास्टकडेही तरुणाई वळली आहे. मीसुद्धा व्हिडिओ पॉडकास्ट तयार करतो आणि मी तरुणांच्या मुलाखती व्हिडिओच्या माध्यमातून, वेगळ्या धाटणीत, शैलीत रेकॉर्ड करतो आणि यु-ट्यूबवर असे पॉडकास्ट प्रसारित करतो. व्हिडिओ स्वरूपात पॉडकास्ट पाहायला मिळत असल्याने त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

नवे माध्यम अनेकांसाठी करिअरचे पर्याय बनले आहे.’ प्रणव दीपा प्रशांत म्हणाला, ’आम्ही सामाजिक विषयांवर व्हिडिओ पॉडकास्ट तयार करतो. सामाजिक विषयांवरील असे पॉडकास्ट पाहणार्‍यांची संख्याही मोठी आहे. आधी आम्ही ऑडिओ पॉडकास्ट तयार करायचो. आता आम्ही व्हिडिओद्वारे असे विषय मांडत आहोत. सध्या या माध्यमाकडे अनेकजण वळले असून, तरुणच तरुणांमधील विषय याद्वारे मांडत आहेत.’

Back to top button