पुणे : टांझानीयन तस्करांसह दोघांकडून कोकेन जप्त

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कोकेन विक्रीसाठी आलेल्या टांझानियातील तरुणासह दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. त्यांच्याकडून सहा लाख 25 हजारांचे 36 ग्रॅम 920 मिलीग्रॅम कोकेन, मोबाइल असा सात लाख 58 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बेका हमीस फाऊनी (वय 46, सध्या रा. साईबाबानगर, कोंढवा खुर्द, मूळ रा. टांझानिया), अरशद अहमद इक्बाल खान (वय 42, रा. साईबाबानगर, कोंढवा खुर्द) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
दोघांच्या विरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फाऊनी आणि खान कोकेन विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस शिपाई नितेश जाधव यांना खबर्याने दिली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. त्यांच्याक डून त्यांच्याकडून कोकेन, मोबाइल असा सात लाख 58 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. फाऊनी याला यापूर्वी पोलिसांनी अमली पदार्थ विक्री प्रकरणात पकडले होते.
नुकताच तो जामीन मिळवून कारागृहातून बाहेर आला आहे. अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, मनोज साळुंके, मारुती पारधी, प्रवीण उत्तेकर, योगेश मोहिते, विशाल दळवी आदींनी ही कारवाई केली.