पुणे : गाडी अडवून व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीतील संशयित जेरबंद | पुढारी

पुणे : गाडी अडवून व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीतील संशयित जेरबंद

नारायणगाव : वृत्तसेवा : ओतूर मढ (ता. जुन्नर) येथे मध्यरात्रीच्या सुमारास गाडी आडवी लावून व्यापाऱ्याचे पैसे लुटणाऱ्या टोळीतील सात महिन्यांपासून फरार असलेला संशयितास जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. या गुन्ह्यातील चौघांपैकी तिघे यापूर्वी पकडले होते. एक संशयित सात महिन्यांपासून फरार होता, त्यास पकडण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली. भैया ऊर्फ सागर साहेबराव खांदे (वय २२, रा. येवले आखाडा, ता. राहुरी, जि. अहमदनगर) असे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी पकडलेल्या संशयिताचे नाव असून, याबाबतची फिर्याद सुरेश राजेंद्र कोठारी (वय ४४, रा. नारायणगाव, ता. जुन्नर) यांनी दिली होती.

दि. १२ मे २०२२ रोजी फिर्यादी व त्यांच्याकडे कामाला असलेला दीपक बंडगर हे पिकअप गाडीमध्ये तेल घेऊन मुरबाड येथे गेले होते. तेथून रोख रक्कम घेऊन परत नारायणगावच्या दिशेने येत असताना ओतूरच्या हद्दीत मढगाव येथे आले असता त्यांच्या पिकअप गाडीसमोर एक चारचाकी गाडी आडवी लावून त्यातून ४ ते ५ जण खाली उतरून ते गाडीजवळ आले. त्यांनी चालकला दमदाटी करून पैसे असलेली पिशवी घेऊन गेले. या फिर्यादीनंतर दीपक अरुण बंडगर, लखन ज्ञानदेव वैरागर आणि शरद भास्कर खाजेकर या तिघांना यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखाने राहुरी येथून अटक केली होती. उर्वरित फरार संशयितांचा शोध गुन्हे शाखेमार्फत सुरू होता. गुरुवारी (दि. १९) गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली, की फरार संशयित भैया ऊर्फ सागर हा त्याच्या गावात येणार आहे. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने राहुरी फॅक्टरी नाका राहुरी येथे सापळा लावून त्याला ताब्यात घेतले व त्याला पुढील तपासासाठी ओतूर पोलिसांच्या ताब्यात दिले.

ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.अंकित गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, पोलिस हवालदार दीपक साबळे, राजू मोमीन, पोलिस नाईक संदीप वारे, पोलिस जवान अक्षय नवले यांनी केली.

Back to top button