पुणे : मिरज रेल्वे मार्गिकेचे भूसंपादन पूर्ण : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख | पुढारी

पुणे : मिरज रेल्वे मार्गिकेचे भूसंपादन पूर्ण : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे-मिरज रेल्वेमार्गाच्या दुसर्‍या मार्गिकेसाठीचे भूसंपादन पूर्ण झाले आहे. रेल्वेलाईनचे कामदेखील अंतिम टप्प्यात आहे. यामुळे नागरिकांसह शेतकरी, व्यापारी, नोकरदारांसाठी गतिमान प्रवासाची सोय होणार असून, परिसरातील अर्थविकासाला चालना मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी व्यक्त केला. पुणे-मिरज रेल्वेमार्गाच्या दुसर्‍या मार्गिकेची एकूण 280 कि. मी. पैकी पुणे जिल्ह्यातील बाधित लांबी 35 कि.मी. इतकी आहे.

यासाठी जिल्ह्यातील 14 गावांतील एकूण 18 हेक्टर जमिनीची आवश्यकता होती. भूसंपादन करण्यात आलेल्यापैकी 13.10 हे. आर खासगी जमीन होती. तर, 0.3475 हे. आर सरकारी जमीन, तर 4.55 हे. आर वनजमीन हस्तांतरित करण्यात आली आहे. भूसंपादनाची कार्यवाही 8 महिन्यांत पूर्ण केली. त्यामुळे प्रकल्पाच्या कार्यवाहीला गती मिळाली. महसूल, वनविभाग, रेल्वे, तसेच नगररचना व मूल्यांकन विभागांच्या योग्य समन्वयामुळे रेल्वेला या जमिनीचा ताबा गती दिली आहे. या प्रकल्पासाठी खासगी जमीन वाटाघाटीने खरेदी करण्याची प्रक्रिया जून 2022 पर्यंत पूर्ण करण्यात आली.

येथील कामे झाली पूर्ण…

रेल्वे विभागाने विस्तारीकरणासाठी आवश्यक जमिनीचा ताबा पूर्वीच घेऊन काम जवळपास पूर्ण केले आहे. पुणे/घोरपडी- सासवड रोड, सासवड रोड- फुरसुंगी, फुरसुंगी- आळंदी, दौंडज- वाल्हा, आळंदी- शिंदवणे, आंबळे- राजेवाडी, राजेवाडी- जेजुरी, जेजुरी- दौंडज आणि वाल्हा- निरा या ब्लॉक सेक्शनमधील कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. भराव, लहान-मोठे पूल, रेल्वे ओलांडणी पूल, अंडरपास इत्यादी कामे प्रगतिपथात आहेत, अशी माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.

या गावांचा आहे समावेश
पुरंदर तालुक्यातील आंबळे, बेलसर, धालेवाडी, दौंडज, पिंपळे खुर्द, वाल्हा, पिसुर्टी, थोपटेवाडी, जेजुरी ही 9 गावे, हवेली तालुक्यातील लोणी काळभोर, फुरसुंगी आणि वळती ही तीन, तर दौंड तालुक्यातील डाळिंब व ताम्हणवाडी या दोन गावांचा समावेश आहे.

Back to top button