शिरूर : पाणी योजनांना स्रोत मिळेना; दमदाटी, धमक्यांनी, पोलिस बळाने आंदोलन दडपतात | पुढारी

शिरूर : पाणी योजनांना स्रोत मिळेना; दमदाटी, धमक्यांनी, पोलिस बळाने आंदोलन दडपतात

अभिजित आंबेकर

शिरूर : निमगाव भोगीपासून पलीकडे हा ओढा अण्णापूर गावालगत जातो. या गावाला पेयजल योजनेसाठी पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. मात्र, कुठेच पिण्यायोग्य पाणी मिळाले नसल्याने अखेर संपूर्ण योजनाच रद्द करावी लागली. ज्या ठिकाणाहून पाणी वाहत जाते, त्या ठिकाणी मोठा तेलाचा तवंग निर्माण झालेला असून, अजूनही फेसाळयुक्त पाणी पाहायला मिळते. ज्या पाण्याला हातसुद्धा लावता येत नाही, ते पाणी जनावरे जर प्यायली तर ती मृत्युमुखी पडतात. दूधधंदा करणे ही फार लांबची गोष्ट, अशी या भागातील अवस्था आहे.

रांजणगाव औद्योगिक वसाहतीत असलेली महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड या कंपनीविरोधात अनेक आंदोलने झाली. मात्र, या आंदोलनात वेळोवेळी केवळ मुस्कटदाबी अन् बुक्क्यांचा मार सहन करावा लागला. जर आंदोलनाचे हत्यार उपसले तर कधी ठेकेदाराची दमदाटी तर कधी पोलिसी अत्याचाराचा धाक. मंडप जरी टाकला तरी उखडून टाकणे, धमक्या देणे, पोलिसी खाक्या दाखवणे, सरकारी कामात अडथळा, खंडणीचे गुन्हे दाखल करणे हे प्रकार घडले. ज्यांनी आंदोलन केले त्यांच्यावर हल्ले करण्याचे प्रकार घडले.

शासनाकडून आश्वासने देण्यात आली, ती मात्र हवेतच विरली. ना प्रदूषण नियंत्रण मंडळाने गांभीर्याने लक्ष दिले, ना शासनाने नागरिकांचे गार्‍हाणे ऐकले. आज प्रत्येक जण मरणयातना भोगतो आहे. अन्यायाविरुद्ध दाद मागायची कोणाकडे अन् आवाज उठवायचा तरी कसा? हाच प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. आजपर्यंत झालेली प्रत्येक आंदोलने मोडीत काढण्यात कंपनी जरी यशस्वी झाली असली, तरी त्याचा केवळ एकाच पिढीवर परिणाम झाला नाही, तर अनेक पिढ्या हा त्रास भोगणार आहेत.

…तर पेटवून घेऊ
एमईपीएल कंपनीसाठी नव्याने पुन्हा 55 एकर क्षेत्र हे निमगाव भोगीजवळ अधिग्रहित केल्याचे बोलले जात आहे. हे जर घडत असेल तर आम्ही महिला व सर्वच कुटुंबांतील सदस्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेटवून घेऊ, असा इशारा या वेळी गावातील महिलांनी दिला आहे.

Back to top button